*शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’*
*शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’*
नंदूरबार(प्रतिनिधी):-वारणा आणि पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीचा जलविभाजक असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व दिशेने पसरलेल्या रांगेच्या उंच डोंगर पर्नाल पर्वत म्हणजेच पन्हाळा. पन्हाळा हा पावनगड आणि पन्हाळा असा जोड किल्ला आहे. समोरच दख्खनचा राजा म्हणून ओळखला जाणार जोतिबाचा डोंगर याच रांगेत आहे. ईशान्येला पसरलेलं वारणेचे विस्तीर्ण खोरे, पूर्व आणि दक्षिणेकडे पंचगंगा आणि कासारीचे खोरे आणि कोल्हापूर परिसर तर पश्चिमेकडे विशाळगडपर्यंतचा संपूर्ण परिसर.
शिलाहार राजा भोज यांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळा. शिलाहारांच्या कोल्हापूर घराण्याच्या राजधानीचा मान या किल्ल्याकडेच होता. या किल्ल्याच्या वास्तूरचनेतून शिलाहार कालीन वास्तू निर्मिती कशा प्रकारे होती हे दिसून येते. वाघ दरवाजा येथे असलेले मयुर आणि गरुडाचे चिन्ह हे या गडाचे प्राचिनत्व सिद्ध करते. कोकण आणि दख्खनचे पठार यांना जोडणारा महत्वाचा व्यापारी मार्ग प्राचिन काळापासून प्रचलित आहे. अनुस्कुरा घाट आणि आंबा घाट मार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे आणि संरक्षणाच्या दृष्टीने पर्नाल पर्वत हे ठिकाण मोक्याचे व महत्वाचे असल्याचे जाणून शिलाहार राजा भोज याने पन्हाळा किल्ला बांधला आणि त्याला आपल्या राजधानीचे स्थान बनवले. असा हा प्राचीन पन्हाळा शिलाहारांनतर यादव आणि त्यानंतर बहमनी, आदिलशाही अशा सत्ताधिशांच्या अंमलाखाली राहिला. प्रतापगडच्या युद्धानंतर आदिलशाहीमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पर्यंतचा आदिलशाही मुलूख जिंकला. त्याचवेळी 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्लाही जिंकुन घेतला. त्यानंतर पन्हाळा किल्ल्याला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने त्याच्या समोरच लागून असलेल्या डोंगरावर अर्जोजी यादव यांच्या देखरेखीखाली पावनगड उभारण्यात आला. यामुळे पन्हाळा आणखी भक्कम व भव्य झाला. या किल्ल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना जोडलेल्या आहेत. मराठा इतिहासापुरता विचार करता स्वराज्यातील अनेक महत्वाच्या लढायांचा आणि प्रसंगांचा मुक साक्षीदार आहे पन्हाळा.
सिद्दी जोहरचा वेढा आणि पावनखिंडची लढाई. 1659 मध्ये कोल्हापूर, पन्हाळा सोबतच दक्षिण कोकणचा प्रांत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर आदिलशाही दरबारामध्ये एकच गोंधळ उडाला. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबाराने सिद्दी जोहर या सेनापतीची नेमणूक केली. सिद्दी हा अफजल खानाइतकाच क्रूर आणि धूर्त होता. त्याने मराठ्यांसोबत युद्ध पुकारून मिरज मार्गे कोल्हापूर प्रांतावर हल्ला केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढाईच्या तयारीने पन्हाळा सज्ज केला. सिद्दी जोहरने पन्हाळा गडाला कडक वेढा घातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्याची योजना आखली. भर पावसातही वेढ्याचे काम जोराने चालवले. त्यामुळे गडावरील अन्न- धान्य व युद्ध साहित्य कमी होत चालले. या सर्वांचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा फोडून निसटण्याचा बेत आखला. त्यासाठी त्यांनी शिवा काशिद या मावळ्याला वेशांतर करून सिद्दीच्या भेटीस पाठवले आणि आपण स्वतः वाघ दरवाजा उतरून विशाळगडच्या दिशेने कुच केले. शत्रूने मराठा सैन्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी छत्रपतींसोबत रायाजी बांदल आणि त्यांचे सैन्य, शंभुसिंह जाधव, बाजी प्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे असे कसलेले योद्धे होते. त्यांनी महाराजांना सांगितले की त्यांनी विशाळगड जवळ करावा आणि आम्ही खिंडीत शत्रुला अडवून धरतो. यानुसार रायाजी बांदल आणि त्यांचे सैन्य, शंभुसिंह जाधव, बाजी प्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे यांनी घोड खिंड (पावन खिंड) येथे सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले. या खिंडीत झालेल्या लढाईमध्ये दुर्दैवाने हे सर्व वीर धारातिर्थी पडले. त्याचे स्मारक आजही आपल्याला पांढरे पाणी (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) येथे पहावयास मिळते.
पन्हाळा पुन्हा स्वराज्यात. सिद्दीच्या वेढ्यानंतर पन्हाळा पुन्हा आदिलशाहीकडे गेला. त्यामुळे कोल्हापूर प्रांतावरील मराठ्यांचे वर्चस्व धोक्यात आले. तसेच राजापूर बंदरातील व्यापारावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे पन्हाळा पुन्हा स्वराज्यात आणण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. 1674 मध्ये हिरोजी फर्जंद या सेनापतीने अवघ्या 60 मावळ्यांनिशी रात्रीचा छापा टाकून पन्हाळा जिंकून घेतला आणि पन्हाळा पुन्हा स्वराज्यात समील झाला.
औरंगजेबाची स्वारी आणि मराठ्यांची चिवट झुंज.
छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबास कडवी झुंज देऊन स्वराज्याचे रक्षण केले. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी लढा सुरूच ठेवला. जिंजीहून आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी पन्हाळा ही राजधानी करून काहीकाळ येथूनच कारभार चालवला. यानंतर सन 1700 मध्ये राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी ताराराणी यांनी लढा सुरू ठेवला. महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वात मराठा सरदारांनी मुघलांना चिवट झुंझ दिली.
मराठ्यांची राजधानी पन्हाळा. महाराणी ताराराणी यांनी पन्हाळा येथे राजधानी घोषीत करून कोल्हापूर संस्थांनची स्थापना केली. यानंतर अनेक वर्ष कोल्हापूर संस्थानचा कारभार पन्हाळा किल्ल्यावरून चालत होता. याची साक्ष म्हणजे पन्हाळा किल्ल्यावर असलेले कचेरीचे वाडे. पन्हाळा हा किल्ला बांधताना दीर्घकालीन लढाईसाठी सुसज्ज असा किल्ला उभारण्यात आला होता. समुद्रसपाटीपासून तब्बल 845 मीटर उंचीवर, आणि 7 चौरस किलोमीटरच्या अफाट विस्तारावर उभा असलेला हा किल्ला, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. पन्हाळा व पावनगड हे दोन्ही जोडकिल्ले खोल दरीच्या साहाय्याने एकमेकांशी जोडलेले आहेत. शिवकालीन लष्करी दृष्टिकोनातून या दोन किल्ल्यांची सांगड ही एक अपूर्व अशी संरक्षणयंत्रणा होती. रचना आणि वैशिष्ट्ये. किल्ल्याच्या मध्यभागी बालेकिल्ला असून तो पूर्वीच्या काळी मुख्य केंद्रबिंदू होता. आजही त्याची मजबूत तटबंदी अभिमानाने उभी आहे. याच आवारात तीन प्रचंड धान्यकोठारे आहेत. त्यापैकी दोन बहामनी काळात बांधले गेलेले, तर तिसरे काळ्या दगडात बांधलेले कोठार मराठाकालीन आहे. या धान्य कोठाऱ्यांमुळे किल्ला दीर्घकाळ शत्रूच्या वेढ्यात टिकून राहू शकत असे. संपूर्ण डोंगराभोवती पसरलेली पन्हाळ्याची भव्य तटबंदी नागमोडी वळणे घेत डोंगरशिखरांवरून पुढे सरकते. त्यामध्ये अनेक गुप्त दरवाजे व मार्ग लपलेले आहेत. तीन दरवाजा, वाघ दरवाजा, चार दरवाजा असे भव्य दरवाजे या किल्ल्याला आहेत. पैकी चार दरावाजा अस्तित्वात नाही. त्याशिवाय आंधार बाव ही बारमाही विहीर या किल्ल्यात आहे. वास्तू रचनेचा अनोखा अविष्कार या ठिकाणी दिसून येतो. तीन दरवाजाच्या वरती गजाननाचे शिल्प कोरलेले आहे. तर वाघ दरवाजातून खाली जात असताना डाव्या हातास पद्म, मयूर व वरती असलेले गरूड शिल्प हा किल्ला प्राचीन असल्याची साक्ष देत आहे. तटबंदीवर तब्बल 40 हून अधिक बुरुज उभे आहेत. त्यांपैकी काळा बुरुज आणि पुसाटी बुरुज हे विशेष उल्लेखनीय आहेत. मराठ्यांनी हे बुरुज अधिक मजबूत केले, तसेच तोफांसाठी उंच दमदमे उभारले. पन्हाळा हा फक्त लष्करी किल्ला नव्हता. त्याच्या आवारात आजही भव्य राजवाडे, मंदिरे आणि प्रशासकीय इमारतींचे अवशेष दिसतात. अंबारखाना, राजमाता ताराराणींचा राजवाडा आणि विशाल धान्यकोठारे हे त्या काळातील मराठ्यांच्या दूरदृष्टीचे आणि वास्तुकलेचे द्योतक आहेत. या इमारतींमधूनच किल्ल्याचे प्रशासन चालत असे. संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई.