*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार तथा क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने व जिल्हा क्रीडा कार्यालय, नंदुरबार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेत एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलाविष्काराच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील समूह लोकनृत्य स्पर्धेतील सादरीकरणासाठी यंदाच्या 2026 या वर्षी शासनातर्फे 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही संकल्पना ठरवण्यात आलेली असल्याने, या माध्यमातून व्यसनमुक्तीसारखा ज्वलंत आणि समाजप्रबोधनात्मक विषय निवडण्यात आला होता.लोककलेच्या प्रभावी माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत युवकांनी व्यसनांपासून दूर राहून देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी विचार आपल्या सादरीकरणातून मांडला. यासाठी व्यसनमुक्तीवर आधारित हरियाणा राज्यातील पारंपरिक लोकगीतावर मनोरंजनासोबतच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारे हे सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकांसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, अत्यंत कमी वेळ उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सांघिक भावनेच्या जोरावर लोककलेचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतानाच कलात्मकता आणि आत्मविश्वासाचीही प्रचिती आली.
या यशामागे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख प्रा. मीनल वसावे तसेच प्रा. सुवर्णा गिरासे, प्रा. चंद्रकांत देसले आणि संगीत शिक्षक रश्मिकांत त्रिवेदी यांचे विशेष योगदान लाभले. तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी पेटी आणि तबल्याची साथ देणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान शिक्षक विशाल पाटील यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सर्व शिक्षकांच्या समन्वयपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अल्पावधीत उत्कृष्ट सादरीकरण करता आले. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव जोपासण्याची महाविद्यालयाची परंपरा या यशामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास जयंत नटावदकर, माजी प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर, जयदीप नटावदकर तसेच प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सहभागी कलाकारांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



