*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे प्रतिबंधित गुटख्याची कथित साठवणूक आणि विक्रीचा मुद्दा चर्चेत आला आहे. संतोष उर्फ ओमकार नामक व्यक्तीने लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. चारचाकी वाहने आणि पिकअपच्या माध्यमातून परिसरातील गावांमध्ये गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान राज्यात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही बेटमोगरा, मुखेड, शंकर नगर, गडगा, रातोळी, नरसी, वनाळी, टाकळी, आदमपुर परिसरातील पानटपऱ्या, हॉटेल्स आणि किराणा दुकानांमध्ये गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अवैध विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका वाढत असून, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या कथित व्यवसायाकडे स्थानिक पोलीस अधिकारी, बिट जमादार, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. आर्थिक लोभापोटी कारवाई टाळली जात असल्याची चर्चा असली, तरी या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्तीविरोधात आवाज उठविणाऱ्यांना धमकावले जात असल्याचीही चर्चा परिसरात आहे.
गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होतो? राज्यात गुटखा बंदी असतानाही लाखो रुपयांचा गुटखा बेटमोगऱ्यात पोहोचतो कसा? त्याचा पुरवठादार कोण? गावोगावी होणाऱ्या विक्रीच्या जाळ्याला कोणाचे अभय आहे? संबंधित यंत्रणांना याची माहिती नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कथित गुटखा साठ्याची तपासणी करावी. पुरवठा साखळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रतिबंधित गुटख्याचा हा व्यवसाय तरुण पिढीच्या आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.



