*"स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती" तर्फे नवनियुक्त विभागीय संघटकांना नियुक्तीपत्रांचे वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती" तर्फे नवनियुक्त विभागीय संघटकांना नियुक्तीपत्रांचे वितरण*
*"स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती" तर्फे नवनियुक्त विभागीय संघटकांना नियुक्तीपत्रांचे वितरण*
मुंबई(प्रतिनिधी):-मराठी भाषा, महाराष्ट्राचे हित आणि मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या 'स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती'च्या वतीने 15 नोव्हेंबर रोजी दादर येथील तिरुपती ट्रेनिंग सेंटरमध्ये दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केलेल्या सदस्यांना 'विभागीय संघटक' म्हणून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. समितीचे पदाधिकारी अमर कदम, जयराम वीर, विजय औटी, संजय धुरी, प्रसन्न कलमस्टे, सचिन घाणेकर आणि सौ. सीमा तांबोळी यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांना विभागीय संघटक म्हणून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे पदाधिकारी मिलिंद प्रधान यांनी उपस्थित नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले व त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
समितीचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी नवनियुक्त सदस्यांना संघटनेची स्थापना, उद्दिष्टे, ध्येय-धोरणे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच समितीची भूमिका आणि भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली. समितीचे पदाधिकारी बाबाजी सावंत यांनी नवनियुक्त सदस्यांना 'विभागीय संघटक' म्हणून काम करताना पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, संघटनात्मक कार्यपद्धती, स्थानिक पातळीवरील प्रश्नांचे संकलन आणि त्यांचा पाठपुरावा करण्याबाबत मार्गदर्शन केले 'स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती'च्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन व संवर्धन, राज्यातील नोकऱ्या तसेच व्यवसाय-धंद्यांशी संबंधित शासकीय योजनांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, परराज्यांतून होणाऱ्या अनियंत्रित स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हिसा कायदा लागू करण्याची मागणी, परराज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात मतदान करण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळू नये, राज्याच्या शासकीय योजनांचा लाभ स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने मिळावा, अशा विविध मागण्यांसह महाराष्ट्राच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर समिती सातत्याने जनजागृती व पाठपुरावा करीत आहे. या कार्यक्रमात वसंत जाधव मानखुर्द, सुनील सावंत खारघर, जयेश मोरे विरार, राजा साहेब वसई, सचिन सूर्यवंशी लालबाग, सचिन पुजारे जोगेश्वरी, सुरेश सुलाखे - अंधेरी, श्रीमती मनिषा पवार गोरेगाव, रितेश धुरी मालाड, विशाल बांदवलकर कर्जत, सचिन मंगरूळकर अंबरनाथ, सुभाष थोरात मुलुंड, चेतन चव्हाण घाटकोपर,अरविंद माने घाटकोपर या सदस्यांना विभागीय संघटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी समितीच्या पदाधिकारी सौ. सीमा तांबोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 11 नोव्हें. 2026 रोजी छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर भोजपुरी गाणी कर्णकर्कश आवाजात वाजविण्यात येत असल्याच्या प्रकाराची त्यांनी तत्परतेने दखल घेतली होती. वडाळा रेल्वे स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल करून ही गाणी बंद करण्यास रेल्वे प्रशासनाला भाग पाडले होते. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल विविध दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांनीही घेतली होती. त्यांच्या या तत्परतेबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल कार्यक्रमात त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
समितीचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना, केवळ पद स्वीकारणे महत्त्वाचे नसून त्या पदाची जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण हितासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. या नियुक्त्यांमुळे समितीचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत होण्यासह मुंबई, उपनगर, नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागांत समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. 'ज्यांची भूमी, त्यांचे धोरण आणि त्यांचेच कायदे,' या ठाम भूमिकेतून महाराष्ट्राच्या न्याय्य हक्कांसाठी समितीचा संघटनात्मक आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला संघर्ष यापुढेही अधिक जोमाने सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला आमरेश पाथरे, मिलिंद प्रधान, अमर कदम, बाबाजी सावंत, प्रसन्न कलमस्टे, संजय धुरी, विजय औटी, सचिन घाणेकर, सौ. सीमा तांबोळी, जयराम वीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



