*महात्मा जोतीराव फुले, सामाजिक क्रांतीचा विचार आणि परिवर्तनाचा अखंड वारसा, द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून उलगडले महात्मा फुलेंचे जीवà
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा जोतीराव फुले, सामाजिक क्रांतीचा विचार आणि परिवर्तनाचा अखंड वारसा, द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून उलगडले महात्मा फुलेंचे जीवà
*महात्मा जोतीराव फुले, सामाजिक क्रांतीचा विचार आणि परिवर्तनाचा अखंड वारसा, द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून उलगडले महात्मा फुलेंचे जीवनकार्य*
नंदुरबार(प्रतिनिधी):-"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले." या शब्दांतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाला परिवर्तनाची नवी दिशा दिली. शिक्षण, समता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि शोषितांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करताना त्यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधिक प्रकर्षाने जाणवते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा आढावा घेतला. सूत्रसंचालक प्रणय जयश्री कैलास चव्हाण यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याबरोबरच शिक्षण, शेतकरी कल्याण, दुष्काळ निवारण आणि सामाजिक न्यायाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.
शिवरायांची राज्यक्रांती; फुलेंची सामाजिक क्रांती, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली, तर महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडवली, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. तत्कालीन समाजव्यवस्थेत बहुजन समाजातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित होता. सामाजिक विषमता, जातिभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांमुळे अनेक घटकांना प्रगतीच्या संधी उपलब्ध नव्हत्या. या परिस्थितीत शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे महात्मा फुले यांनी ओळखले. त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक सुधारणांचा मार्ग दाखविला.
स्त्रीशिक्षणातून परिवर्तनाची मुहूर्तमेढ, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याच्या त्यांच्या निर्णयाला तीव्र सामाजिक विरोध सहन करावा लागला.
सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण आणि चिखल फेकण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. मात्र, या विरोधाला न जुमानता फुले दाम्पत्याने शिक्षणाचा प्रसार सुरू ठेवला. स्त्रियांबरोबरच तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजघटकांनाही शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महिलांना आत्मसन्मान, स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचा हा लढा महत्त्वपूर्ण ठरला. सामाजिक सुधारणांना कृतीची जोड, महात्मा फुले यांनी समाजातील अन्यायकारक रूढी आणि प्रथांविरोधात आवाज उठवला. विधवा महिलांना आधार देण्यासाठी आणि बालहत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केले. सामाजिक बहिष्काराचा सामना करणाऱ्या महिलांना सुरक्षिततेचा आधार देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. सामाजिक समतेचा विचार त्यांनी स्वतःच्या आचरणातूनही पुढे नेला. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. त्या काळातील जातीय विषमतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सामाजिक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करणारा होता. फुले दाम्पत्याने यशवंत यांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन केले आणि त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मानवतेचा विचार प्रत्यक्ष जीवनात कसा उतरवता येतो, याचे हे उदाहरण असल्याचे मंत्री भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले. साहित्य आणि सत्यशोधक चळवळीतून जनजागृती, महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाबरोबरच साहित्य आणि संघटनशक्तीचा प्रभावी वापर केला. 'गुलामगिरी' आणि'शेतकऱ्याचा आसूड' या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन सामाजिक विषमता, शोषण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिकित्सक मांडणी केली. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, दुर्बल घटकांचे शोषण थांबावे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक समतेच्या चळवळीला संघटित स्वरूप दिले. जन्माधारित उच्चनीचतेला विरोध करत मानवी प्रतिष्ठा, विवेक आणि समानतेचा पुरस्कार केला. समाजाने अंधश्रद्धेपेक्षा तर्काला आणि परंपरांपेक्षा मानवतेला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची भूमिका होती.
शिक्षणाचा अधिकार : फुलेंच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब
शिक्षणाचा प्रसार हा केवळ व्यक्तिगत प्रगतीसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक असल्याची महात्मा फुले यांची भूमिका होती. सर्व घटकांना समान शिक्षण मिळावे आणि वयाच्या 14 वर्षांपर्यंत शिक्षण सक्तीचे असावे, अशी मागणी त्यांनी ब्रिटिश सत्तेकडे मांडली होती. आज भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाच्या अधिकारामुळे 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची कायदेशीर हमी प्राप्त झाली आहे. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या महात्मा फुले यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व या पार्श्वभूमीवर अधिक स्पष्ट होते.
शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांविषयी संवेदनशील भूमिका, महात्मा फुले यांचे कार्य शिक्षण आणि सामाजिक सुधारणांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले. शेतीवर अवलंबून असलेल्या समाजघटकांचे आर्थिक शोषण, सावकारी आणि दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची त्यांनी दखल घेतली.
दुष्काळाच्या काळात गरजू नागरिकांसाठी मदतकार्य आणि अन्नछत्रे चालवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. संकटाच्या काळात गरजूंपर्यंत मदत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. मुलाखतीत मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, बियाणे उपलब्ध करून देणे, कर्जमाफी, पाणी व्यवस्थापन, शेतीमालाला हमीभाव आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीर सावकारीमुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फुलेंच्या विचारांची आजही तितकीच गरज, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार तत्कालीन समाजव्यवस्थेतील अन्यायाविरोधात होते. मात्र, त्यांची उपयुक्तता विशिष्ट काळापुरती मर्यादित नाही. शिक्षणातील समान संधी, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक न्याय, शेतकरी कल्याण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी प्रतिष्ठा या विषयांवर आजही व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी केवळ कायदे आणि योजना पुरेशा नसतात. त्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलणे आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागविणेही आवश्यक असते. महात्मा फुले यांनी आपल्या कार्यातून हाच विचार समाजासमोर ठेवला. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे केवळ त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणे नव्हे, तर त्यांनी समाजासमोर ठेवलेली समता, शिक्षण, विवेक आणि मानवतेची मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रुजविण्याचा संकल्प करणे होय. सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढील पिढीपर्यंत, महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. शिक्षणातून प्रबोधन, प्रबोधनातून समता आणि समतेतून सामाजिक न्यायाची स्थापना हा त्यांच्या कार्याचा मूलभूत संदेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यक्रांतीने स्वराज्याची प्रेरणा दिली, तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीने समताधिष्ठित समाजनिर्मितीचा मार्ग दाखविला. या परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपणे आणि त्याला कृतीची जोड देणे, हीच महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल.



