*बिरसा मुंडा आदिवासी अस्मिता आणि स्वातंत्र्यलढ्याचे महानायक-प्रा.डॉ. अशोक ऊईके,आदिवासी विकास मंत्री*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बिरसा मुंडा आदिवासी अस्मिता आणि स्वातंत्र्यलढ्याचे महानायक-प्रा.डॉ. अशोक ऊईके,आदिवासी विकास मंत्री*
*बिरसा मुंडा आदिवासी अस्मिता आणि स्वातंत्र्यलढ्याचे महानायक-प्रा.डॉ. अशोक ऊईके,आदिवासी विकास मंत्री*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, परंतु त्यामध्ये बिरसा मुंडा यांचे योगदान खूप वेगळे आणि मोठे आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी तसेच आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी झालेल्या क्रांतीचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले. अवघ्या 25 वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी ब्रिटिश साम्राज्य आणि आदिवासींचे शोषण करणा-या स्थानिक जमीनदार व सावकारांच्याविरोधात उभा केलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. आदिवासींसाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आदिवासी समाज त्यांना “धरती आबा” (धरतीचे पिता) आणि “भगवान बिरसा” म्हणून ओळखतो.
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सध्याच्या झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यातील उलिहातू या गावी झाला.
लहानपणापासूनच हुशार असलेल्या बिरसा यांचे प्राथमिक शिक्षण ख्रिश्चन मिशनरी शाळेत झाले. शिक्षणासाठी त्यांनी सुरुवातीला ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, परंतु आदिवासी संस्कृतीवर होणारे अतिक्रमण आणि धर्मांतराचे वास्तव लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा आपल्या मूळ संस्कृतीचा स्वीकार केला.
त्यांनी 1894-95 च्या सुमारास पारंपरिक मुंडा धर्म, वैष्णव विचार आणि सामाजिक सुधारणांचे मिश्रण करून“बिरसायत” नावाचा नवीन पंथ स्थापन केला. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा, मद्यपान आणि जादूटोणा सोडून एकाच देवावर विश्वास ठेवण्याचे व नैतिक जीवन जगण्याचे आवाहन केले. ब्रिटिशांनी 'छोटा नागपूर' भागात लागू केलेल्या नवीन जमीन कायद्यांमुळे आदिवासींची पारंपरिक सामायिक शेती पद्धत (खूंटकट्टी) नष्ट झाली होती. जमीनदार आणि सावकारांनी आदिवासींच्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली. बिरसा मुंडा यांनी या शोषणाविरुद्ध 'उलगुलान'ची (म्हणजे 'महान उठाव' किंवा 'क्रांती') हाक दिली. बिरसा यांनी हजारो आदिवासींना धनुष्यबाण आणि पारंपरिक शस्त्रांसह एकत्र केले. ब्रिटिशांची पोलीस ठाणी, महसूल कार्यालये आणि सावकारांच्या घरावर हल्ले चढवले. 9 जानेवारी 1900 रोजी डोंबारी टेकडीवर (Dombari Hill) बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी जनसमुदाय एकत्र आला होता. ब्रिटिशांनी या टेकडीला वेढा घातला आणि निष्पाप आदिवासींवर अंधाधुंध गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत शेकडो आदिवासींना हौतात्म्य प्राप्त झाले. ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडा सारखीच भीषण मानली जाते.
डोंबारी टेकडीच्या घटनेनंतर बिरसा मुंडा यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला. परंतु, ब्रिटिशांनी दिलेल्या बक्षीसाच्या अमिषाने काहींनी फितुरी केली. 3 मार्च 1900 रोजी चक्रधरपूरच्या जंगलातून बिरसा यांना अटक करण्यात आली. त्यांना रांची येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तुरुंगात रहस्यमय परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.ब्रिटिश सरकारने त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाल्याचं सांगण्यात आलं. परंतु त्यांच्यावर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातो. छोटा नागपूर काश्तकारी कायदा (Chota Nagpur Tenancy Act, 1908), बिरसा यांच्या बलिदानानंतर ब्रिटिशांना आदिवासींच्या असंतोषाची जाणीव झाली. त्यांनी 1908 मध्ये हा कायदा लागू करून गैर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करण्यास मनाई केली. जनजातीय गौरव दिन भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस 'जनजातीय गौरव दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. झारखंड राज्याची निर्मिती: बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधूनच 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. रांची विमानतळासह अनेक शैक्षणिक संस्था, स्मारके आणि पोस्टाची तिकिटे त्यांच्या नावावर आहेत. संसदेत त्यांचे चित्र आहे. आदिवासी समाज अजूनही धरती आबा म्हणून त्यांचे पूजन करतो. भगवान बिरसा मुंडा केवळ एक स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते आदिवासी समाजाचे मार्गदर्शक आणि समाजसुधारक होते. जल जंगल जमिनीचे संरक्षण आणि स्वाभिमानासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. आदिवासी समाजालाच नव्हे, तर शोषित पीडितांना आजही त्यांचे विचार अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. शिक्षण, धर्मसुधारणा आणि सशस्त्र प्रतिकार याच्या बळावर शोषणविरुद्ध लढता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे योगदान केवळ झारखंडपुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतातल्या आदिवासींचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी ते जोडले आहे..



