*फत्तेपूर येथे सरकारी कर्मचारी गौरव सोहळा उत्साहात संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान,युवकांना करिअर व व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फत्तेपूर येथे सरकारी कर्मचारी गौरव सोहळा उत्साहात संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान,युवकांना करिअर व व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन*
*फत्तेपूर येथे सरकारी कर्मचारी गौरव सोहळा उत्साहात संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान,युवकांना करिअर व व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन*
शहादा(प्रतिनिधी):-समाजाच्या प्रगतीसाठी, गावाच्या विकासासाठी आणि शासकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या फत्तेपूर गावातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ युवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सरकारी कर्मचारी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विद्रोही कवी व साहित्यिक तथा आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक सदस्य वाहरु सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी भिल्ल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक वळवी, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे संस्थापक भीमसिंग वळवी, जिल्हा सलोखा समिती सदस्य तथा विद्रोही कवी व साहित्यिक दादाभाई पिंपळे, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी)चे कॉ.चंद्रसिंग बर्डे, महिला किसान अधिकार मंच महाराष्ट्रच्या वनिता पटले/ब्राम्हणे आणि चुनीलाल ब्राम्हणे, साबिर पठाण, कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील 40 सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव!
फत्तेपूर गावातील सुमारे 40 नागरिक विविध शासकीय विभागांत अधिकारी व कर्मचारी म्हणून कार्यरत असून, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य सेवा, परिवहन अशा विविध क्षेत्रांत ते देशसेवा व समाजसेवेचे योगदान देत आहेत. या कर्तृत्ववान कर्मचारी वर्गाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार एकनाथ ठाकरे, पोलीस कर्मचारी महेंद्र पानपाटील, शिक्षक सुरेश ठाकरे, शिक्षक विशाल वळवी, शिक्षक विलास पवार, शिक्षक सतीश ठाकरे, शिक्षक अमोल पाडवी, शिक्षक साबिर पठाण, परिवहन विभागाचे कर्मचारी जेलसिंग पवार तसेच आरोग्य सेवक अमर पवार यांचा समावेश होता. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यासोबतच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पायल ठाकरे या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
गावातील तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार व पोलीस हवालदार एकनाथ ठाकरे हे पोलीस वर्दीत उपस्थित होते. यावेळी PSI विनोद पवार यांनी दिशाहीन व व्यसनाधीन होत चाललेल्या तरुणाईबद्दल चिंता व्यक्त केली. अथक प्रयत्न, मेहनत आणि सातत्य यामध्येच यश दडलेले आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून योग्य ध्येय निश्चित करावे आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पोलीस भरती आणि करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणासोबत संस्कृती संवर्धनाचीही जबाबदारी!
प्रा.अशोक वळवी यांनी गावातील सुमारे 40 शासकीय कर्मचाऱ्यांचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवत सकारात्मक दृष्टिकोनातून मेहनत करण्याचा संदेश दिला. शिक्षणासोबतच आपली बोली भाषा, संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करणे हीदेखील आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भीमसिंग वळवी यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत तरुण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन केले. वनिता पटले यांनी महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण आणि महिलांना पुढे जाण्यासाठी समाजाने पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली. दादाभाई पिंपळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वाहरु सोनवणे यांनी सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांनी केवळ शासकीय सेवेतच नव्हे, तर सामाजिक जबाबदारीचे दातृत्वही पेलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेताना आपला समाज, संस्कृती, भाषा आणि स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी आदिवासी भाषेतून केले. व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्याचा संदेशही त्यांनी दिला. यावेळी कुरेशी आणि साबिर पठाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. साबिर पठाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलवर पाडवी, आणि युवा मंडळ फत्तेपूर आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि नव्या पिढीला शिक्षण, संस्कृती व व्यसनमुक्तीचा संदेश देणारा फत्तेपूरचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरला.



