*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,समता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,कृषी सुधारणा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,समता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,कृषी सुधारणा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,समता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,कृषी सुधारणा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीला सन 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने मुख्यमंत्री यांनी महात्मा जोतीराव फुले यांचे सन 2027 हे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासंदर्भात सन 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. यानुसार सन 2027 मध्ये महात्मा जोतीराव फुले यांचे 11 एप्रिल, 2026 ते 10 एप्रिल, 2027 या कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे द्विजन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व मानवीमूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी 19 व्या शतकात जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कृषी सुधारणा, उद्योजकता आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर आधारित विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.महात्मा फुले यांचे विचार, सामाजिक कार्य आणि सत्यशोधक चळवळीचा वारसा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच 14 शेतकरी एपीएल (केशरी) प्रवर्गातील एकूण 1 कोटी 75 लाख 21 हजार 46 कुटुंबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा संच 100 रुपये या सवलतीच्या दराने वितरित करण्याचे नियोजन आहे. जुलै 2026 ते जून 2027 या कालावधीत चार टप्प्यांत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी वार्षिक 1838.40 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत, विधवा, परित्यक्ता व निराधार महिलांना लघुउद्योगासाठी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यासह विविध उपक्रम प्रस्तावित आहेत. डॉ. झाकीर हुसेन मदरशांमध्ये महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांत ‘महात्मा फुले ग्रंथ कोपरा’, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच निवडक साहित्याचे उर्दू भाषांतर व प्रकाशन करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे साहित्य विनामूल्य वितरित करणे, दिनदर्शिका प्रकाशित करणे, नागपूर येथे समता मॅरेथॉन आयोजित करणे आणि चित्ररथांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रसार करण्याचे नियोजन आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महात्मा फुले यांच्या जीवनावर माहितीपट तयार करून समाजमाध्यमे व दूरदर्शनद्वारे प्रसारित करणे, ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ या ग्रंथाची सवलतीच्या दरात विक्री करणे तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेला महात्मा फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. महसूल विभागामार्फत 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी स्तरावरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले महसुली दावे व अपिले निकाली काढण्यासाठी दर तीन महिन्यांनी लोकअदालती आयोजित करण्यात येणार आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याबद्दल व्याख्यानमाला, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांचा जन्मशताब्दी दिनी गौरव करणे, तसेच कार्यक्षेत्रातील महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारके, पुतळे यांच्या परिसरात सुशोभीकरण, रोषणाई करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कटगुण आणि पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे महात्मा जोतीराव फुले यांची स्मारके विकसित करण्याचे नियोजन आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील सहा प्रशासकीय विभागांमध्ये ‘समग्र महात्मा फुले’, त्यांच्या नाटकांचे प्रयोग आणि शाहू-फुले- आंबेडकरी जलसा यांसारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी 60 लाख रुपयांच्या निधीस वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील 499 शासकीय आश्रमशाळा आणि 949 शासकीय वसतिगृहांमध्ये प्रभातफेरी, व्याख्याने, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन, रांगोळी, चित्रकला, पथनाट्य आणि नाटिका असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘महात्मा फुले तांत्रिक कौशल्य प्रदर्शनी’ आणि ‘सत्यशोधक उद्योजकता कार्यशाळा’ आयोजित करण्यात येणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागांतील बेरोजगार युवक आणि महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण, प्रकल्प स्पर्धा व पारितोषिक वितरणाचेही नियोजन आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत व्याख्याने, प्रदर्शन, चित्रकला, रांगोळी, सुलेखन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशन, महात्मा फुले वाड्याची माहिती पुस्तिका आणि वारसा सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांशी जोडण्याचे उपक्रमही प्रस्तावित आहेत.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत शाश्वत शेती, जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. चार कृषी विद्यापीठांमध्ये शाश्वत शेती व जलसंवर्धन परिषदा, पर्यावरणविषयक पथनाट्ये, घोषवाक्य स्पर्धा आणि समाज माध्यमांवरील चित्रफितींच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंपदा विभागामार्फत एप्रिल 2027 मध्ये खडकवासला धरण जलाशयास महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. यानिमित्त स्मृतिपर मुख्य कार्यक्रम, माहितीपट निर्मिती आणि स्मरणिका प्रकाशनासाठी 50 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांतील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत महाविद्यालयात 18 ते 21 वयोगट विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक घोषवाक्य, सोशल मीडीया रिल्स, बॅनर यांची स्पर्धा आयोजि करण्यात येणार आहे. तसेच वित्त, विमा संचालनालय, मराठी भाषा आणि नगर विकास विभागांमार्फत व्याख्याने, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, महिलांचा गौरव आणि स्मारक परिसरांचे सुशोभीकरण असे उपक्रम प्रस्तावित आहेत. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध विभागांच्या समन्वयातून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम राबवून फुले दांपत्याच्या समतावादी विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यावर शासनाचा भर राहणार आहे.



