*नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे नियोजन, धरणे, तलावांचे पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी; कडबा, पेंढा, भुसा व धाटे सुरक्षित साठविण्
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे नियोजन, धरणे, तलावांचे पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी; कडबा, पेंढा, भुसा व धाटे सुरक्षित साठविण्
*नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे नियोजन, धरणे, तलावांचे पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी; कडबा, पेंढा, भुसा व धाटे सुरक्षित साठविण्यावर भर, मुरघास, हायड्रोपोनिक्स,अझोला निर्मिती आणि युरिया प्रक्रियेबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनिधी):- जिल्ह्यात यंदा सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला असून, त्याचा खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच चारा नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पीक अवशेषांचे संकलन, सुरक्षित साठवणूक व प्रक्रिया, चारा पिकांची लागवड आणि पर्यायी चारा निर्मितीवर भर देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सुमारे 6 लाख 70 हजार पशुधन आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्गातील 2 लाख 92 हजार मोठे पशुधन, सहा महिन्यांपर्यंतची 40 हजार वासरे व पारडे संख्या आहे तसेच सुमारे 3 लाख 40 हजार शेळ्या व मेंढ्यांचा समावेश आहे. या पशुधनासाठी दरमहा अंदाजे 87 हजार मेट्रिक टन कोरड्या चाऱ्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील वनक्षेत्र, शेतीचे बांध, पडीत क्षेत्र, गायरान, कृषी पिकांची दुय्यम उत्पादने आणि वैरण विकास कार्यक्रमांतर्गत वितरित केलेल्या वैरण बियाण्यांमधून सुमारे 9 लाख 82 हजार मेट्रिक टन कोरडा चारा उपलब्ध होण्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. उपलब्ध चारा सुमारे 190 ते 195 दिवस पुरेल, असा अंदाज आहे. मात्र, दुधाळ गाई- म्हशींना अधिक चाऱ्याची आवश्यकता असल्याने चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. संभाव्य चाराटंचाईच्या काळात पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पशुसंवर्धन विभाग, कृषि तसेच वन विभागाशी समन्वय साधून नियमित चारा उत्पादनाविषयी आढावा घेण्यात येत आहे. टंचाई काळात चाऱ्याचा कमतरतेमुळे पशुधनाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याकरिता विभागामार्फत चाराटंचाई बाबत पशुपालकांना जागृत करून चारा बचतीचे महत्व पटवून देण्यात येत आहे. यासाठी कडबा, पेंढा, भुसा आणि धाटे यांसारखे पीक अवशेष न जाळता त्यांचे संकलन करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. हे अवशेष योग्य ठिकाणी सुरक्षितपणे साठवून, आवश्यक प्रक्रिया करून पशुखाद्य म्हणून वापरण्याबाबत शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कडबा आणि एकदल हिरवा चारा जनावरांना जसाच्या तसा न देता कुट्टी करून देण्यात यावा, यामुळे चाऱ्याची नासाडी कमी होऊन उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होईल. चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी युरिया व गूळ प्रक्रियेची प्रात्यक्षिकेही घेण्यात येत आहेत. चारा साक्षरता अभियानांतर्गत मुरघास आणि हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मितीचे महत्त्व पशुपालकांना पटवून देण्यात येत आहे. यासोबतच अझोला बेडच्या माध्यमातून चारा निर्मिती करण्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. धरणे व तलावांतील पाणी पातळी कमी झाल्यानंतर उघड्या पडणाऱ्या गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची पेरणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. वैरण विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे वितरित करण्यासाठी 1 कोटी 60 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी पशुसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध राहावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चारा बंदीचे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील चाऱ्याची परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होऊ नये, यासाठी विविध तपासणी नाक्यांवर दक्षता घेतली जात आहे. तसेच चाऱ्याचे नुकसान होऊ नये, आगीच्या घटनांमुळे चारा वाया जाऊ नये आणि त्याची योग्य प्रकारे साठवणूक व्हावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन करीत आहेत. “टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना शोधण्यापेक्षा टंचाईपूर्वीच उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकरी आणि पशुपालकांनी उपलब्ध पीक अवशेषांवर प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य देण्याची गरज आहे,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
“दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणारी संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रब्बी व उन्हाळी हंगामात चारा पिकांची लागवड करावी. उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन आणि पर्यायी चारा निर्मितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुधनाची चाऱ्याची गरज भागविण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. संजय खाचणे यांनी केले आहे.
पंप दृष्टीक्षेपात
धरणे, तलावांचे पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा क्षेत्रात चारा पेरणी करावी. संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. कडबा, पेंढा, भुसा, धाटे सुरक्षित साठविण्यावर भर
युरिया प्रक्रिया, कडबाकुट्टी आणि मुरघासाचे प्रात्यक्षिक
हायड्रोपोनिक युनिट व अझोला बेडमधून चारा निर्मिती.



