*गडदुर्ग अभ्यासक आणि संस्थांसाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार 2026,नामनिर्देशनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत, व्यक्ती आणि संस्थेला प्रत्येकी 51 हजारांचे पारितोषिक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गडदुर्ग अभ्यासक आणि संस्थांसाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार 2026,नामनिर्देशनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत, व्यक्ती आणि संस्थेला प्रत्येकी 51 हजारांचे पारितोषिक*
*गडदुर्ग अभ्यासक आणि संस्थांसाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार 2026,नामनिर्देशनासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत, व्यक्ती आणि संस्थेला प्रत्येकी 51 हजारांचे पारितोषिक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील गडदुर्गांचा इतिहास, संशोधन, जतन आणि संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक नागरिकांना 16 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन नामनिर्देशन करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील गडदुर्गांचा समृद्ध इतिहास जतन करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांसह महाराष्ट्रातील गडदुर्गांचा सखोल अभ्यास, इतिहास संशोधन आणि दुर्गसंवर्धनासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला आणि एका संस्थेला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. वैयक्तिक आणि संस्थात्मक अशा दोन विभागांत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. निवड झालेल्या व्यक्तीला तसेच संस्थेला प्रत्येकी 51 हजार रुपये रोख रक्कम, विशेष सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांची निवड पारदर्शक व शास्त्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी क्षेत्रातील तज्ज्ञ अभ्यासक आणि अनुभवी संशोधकांचा समावेश असलेली ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार समिती’ स्थापन करण्यात आली आहे. प्राप्त नामनिर्देशन आणि शिफारशींचे सखोल परीक्षण करून समिती अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे. गतवर्षी वैयक्तिक विभागातून ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्र. के. घाणेकर यांना, तर संस्थात्मक विभागातून दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ या संस्थेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गडदुर्गांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि राष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या ऐतिहासिक वारशाची माहिती जनसामान्यांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, दुर्गभ्रमंती व इतिहास संशोधनाला प्रोत्साहन मिळावे आणि दुर्गसंवर्धनासाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना व्यापक ओळख मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.महाराष्ट्रातील गडदुर्गांचा अभ्यास, इतिहास संशोधन, दुर्गसाहित्याचा प्रचार-प्रसार आणि दुर्गसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योग्य व्यक्ती व संस्थांची नामनिर्देशने नागरिकांनी करावीत. नामनिर्देशनासाठी www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
नामनिर्देशन कालावधी 16 ते 31 ऑक्टोबर 2026
अर्जांची छाननी 2 ते 3 नोव्हेंबर 2026
महाराष्ट्राच्या देदीप्यमान दुर्गसंस्कृतीचा वारसा पुढे नेणाऱ्या दुर्गसेवकांचा गौरव करण्यासाठी शिवप्रेमी आणि नागरिकांनी नामनिर्देशन प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अमृत कार्यालय, नंदुरबार येथे 9112228771 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



