*नवरात्रोत्सवात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद-जागर आरोग्याचा’उपक्रम,नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवरात्रोत्सवात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद-जागर आरोग्याचा’उपक्रम,नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती*
*नवरात्रोत्सवात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद-जागर आरोग्याचा’उपक्रम,नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवरात्रोत्सवा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील महाविद्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद–जागर आरोग्याचा’ हा विशेष आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयोजित या उपक्रमाद्वारे युवकांचे आरोग्य, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी आहार याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, दामजी पोसल्या गावीत आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, पथराई आणि अहमद गरीब युनानी मेडिकल कॉलेज, अक्कलकुवा येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उपक्रमाच्या प्रारंभीच्या दिवशी 450 हून अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथही घेतली.
व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शनात तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनांपासून दूर राहण्याचे उपाय, मित्रांच्या दबावाला नकार देण्याचे महत्त्व तसेच आवश्यकतेनुसार समुपदेशन व उपचार घेण्याबाबत माहिती देण्यात आली. मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, चिंता, नैराश्याची लक्षणे आणि समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले. सकारात्मक संवाद, समुपदेशन आणि वेळेवर मदत घेण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
आत्महत्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने संकटाची लक्षणे ओळखणे, अडचणीत असलेल्या मित्राला मदत करणे आणि व्यावसायिक मदत घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग, पुरेशी झोप, वैयक्तिक स्वच्छता, स्क्रीन टाइमचे नियोजन आणि आजारांना प्रतिबंध करणाऱ्या चांगल्या सवयी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
युवाशक्ती व राष्ट्रनिर्माण या विषयांतर्गत आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त, सामाजिक जबाबदारी, स्वयंसेवा आणि सकारात्मक निर्णयक्षमता या मूल्यांवर भर देण्यात आला. निरोगी व जबाबदार युवकांचा समाजविकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, समाजसेवा आणि विकसित भारताच्या निर्मितीतील सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये 19 ऑक्टोबर पर्यंत वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.



