*स्पर्धा परीक्षांतील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम गरजेचे-उदय महाजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्पर्धा परीक्षांतील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम गरजेचे-उदय महाजन*
*स्पर्धा परीक्षांतील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम गरजेचे-उदय महाजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित वाचन, योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमांची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे येथील वरिष्ठ संशोधन अधिकारी उदय श्रीरंग महाजन यांनी केले. एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार अंतर्गत अ. ध. वसावे करिअर अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. उदय महाजन यांनी आपल्या प्रशासकीय सेवाप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासाची योग्य दिशा, वेळेचे नियोजन, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धा परीक्षांकडे केवळ परीक्षा म्हणून न पाहता, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची संधी म्हणून पाहावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी त्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधींची जाणीव करून दिली. योग्य नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्येही उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सोप्या व समर्पक शब्दांत उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरणा मिळाली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक रोहन नटावदकर, प्राचार्य डी. के. मराठे, उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी. एन. पाडवी, करीयर अकॅडमीचे प्रमुख प्रा.पुष्पराज पारधी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.ध. वसावे करियर अकॅडमीचे प्रमुख प्रा. पुष्पराज पारधी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत देसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मीनल वसावे यांनी केले.



