*हातणकरवाडी ग्रामस्थांनी 2 लाखांच्या देणग्या जमा करून लोकसहभागातून जि.प.शाळेच्या 3 वर्गखोल्यांची केली छप्पर दुरूस्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हातणकरवाडी ग्रामस्थांनी 2 लाखांच्या देणग्या जमा करून लोकसहभागातून जि.प.शाळेच्या 3 वर्गखोल्यांची केली छप्पर दुरूस्ती*
*हातणकरवाडी ग्रामस्थांनी 2 लाखांच्या देणग्या जमा करून लोकसहभागातून जि.प.शाळेच्या 3 वर्गखोल्यांची केली छप्पर दुरूस्ती*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील गोठणे-दोनिवडे हे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम गाव म्हणून ओळखले जाते. मात्र हातणकरवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.2 मधील 3 वर्गखोल्यांचे छत मोडकळीस आले होते.यासाठी शासनाकडे वारंवार अर्ज- विनंत्या करूनही आवश्यक निधी उपलब्ध होत नव्हता.अखेर कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता ग्रामस्थांनीच लोकसहभागातून सुमारे 2 लाख रुपयांच्या देणग्या जमा करून शाळेच्या 3 वर्गखोल्यांच्या छताची दुरुस्ती पूर्ण केली. ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे गोठणे-दोनिवडे पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यानच्या काळात शिळ गावचे सुपुत्र सुरेश पळसमकर गुरुजी यांची शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मार्च महिन्यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली. संघाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सो.हातणकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या छताच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाली.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे, लग्नानंतर अन्य गावांत स्थायिक झालेल्या माहेरवाशिणी माजी विद्यार्थिनींनीही शाळेसाठी आर्थिक योगदान दिले. माता पुर्वादेवी ग्रामविकास मंडळ, मुंबई (रजि.) यांच्या सहकार्याने माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा केल्या. हातणकरवाडीतील ग्रामस्थांसह अन्य समाजातील नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ आर्थिक मदतीपुरतेच सहकार्य मर्यादित न राहता अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून या कामात सहभाग घेतला.काही दानशूर व्यक्तींनी लाकडी वाशांसाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले, तर काहींनी ते माफक दिले.तसेच लाकडाची वाहतूकही काहींनी सवलतीच्या दरात करून दिली. त्यामुळे लोकसहभागातून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकले. माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने 26 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत लाकडी साहित्याचा वापर करून शाळेच्या 3 वर्गखोल्यांच्या छताची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.याशिवाय, विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोअरवेलची सर्व्हिसिंगही करून देण्यात आली. या कामाच्या जमा- खर्चाचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात 15 सप्टेंबर 2026 रोजी शाळेत सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला मुख्याध्यापक सुरेश पळसमकर गुरुजी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रसाद हातणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीधर हातणकर, गावकर दत्ताराम हातणकर, भिकाजी हातणकर, राजाराम दळवी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष शांताराम य. हातणकर, कार्याध्यक्ष प्रकाश दळवी, सचिव यशवंत जडयार, खजिनदार दिलीप दळवी, उपाध्यक्ष दिनकर दळवी, माजी अध्यक्ष संजय ल. हातणकर, श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था, खार (मुंबई)चे संचालक संतोष तु. गोठणकर, ग्रामपंचायत सदस्य पुनाजी पाजवे, शिक्षक संतोष य. हातणकर व संजय गो. हातणकर, सामाजिक कार्यकर्ते आशफाक मापारी, मुंबई मंडळाचे श्रीपत माळी व सुधाकर माळी, तसेच पांडुरंग ध. हातणकर, प्रकाश लोळगे, सुर्यकांत धों. हातणकर, अशोक हातणकर, महेश पुजारी, प्रशांत हातणकर, उदय जडयार, पेंटर संजय स. हातणकर, गणपत पुजारी, कु.दर्शन जडयार, कु.आर्या जडयार, कु.स्वरा जडयार आदी उपस्थित होते.
तसेच लवकरच लोकसहभागातून उरलेल्या 2 वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे असे अध्यक्ष प्रसाद हातणकर यांनी सांगितले. आज अनेक गावांत जि.प. शाळांच्या वर्गखोल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना हातणकर वाडीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि मुंबई मंडळाने दाखवलेला एकजूटीचा आदर्श इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.



