*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठीचा प्रवास विद्यार्थ्यांनी साकारला बाराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंतच्या मराठी वैभवाचे दृश्यरूपातून दर्शन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ‘मराठी अभिजात भाषा दिन’ उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी बाराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंतचा मराठी भाषेचा समृद्ध प्रवास विविध साहित्यिक, संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकांमधून दृश्य स्वरूपात साकारला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेने काळाच्या विविध टप्प्यांवर घेतलेली वळणे, तिला समृद्ध करणारे साहित्यिक प्रवाह आणि भाषेच्या जतन- संवर्धनासाठी विविध व्यक्तींनी केलेले प्रयत्न विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.
बाराव्या शतकातील महानुभाव संप्रदायातील आद्य कवयित्री महदंबा यांच्यापासून या मराठीच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, समता आणि लोकभाषेचे सामर्थ्य विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. पुढे समर्थ संप्रदाय, शिवकालीन महाराष्ट्र आणि पेशवाईच्या कालखंडातील मराठीचे स्वरूपही सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा आणि राज्य
कारभारातील मराठीच्या वापराचा प्रभावी परिचय करून दिला. परकीय भाषांतील शब्दांचा वाढता वापर टाळण्यासाठी आणि प्रशासनातील संज्ञांना मराठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘राज्यव्यवहार कोशा’चा संदर्भ देत शिवकालीन भाषिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी मांडला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या भूमिकेतून मराठी भाषा, साहित्य, राष्ट्रभावना आणि समाजजागृती यांचा परस्परसंबंध विद्यार्थ्यांनी उलगडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या केशवसुत, पु. ल. देशपांडे, प्रज्ञाताई दया पवार, इंदिरा संत आणि शांता शेळके यांसारख्या साहित्यिकांच्या योगदानाचीही विद्यार्थ्यांनी ओळख करून दिली. मराठी साहित्याच्या विश्वात मानाचा तुरा रोवणाऱ्या चार ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची भूमिकाही विद्यार्थ्यांनी साकारली. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यिक योगदानाचा परिचय करून देत मराठी भाषेच्या समृद्धीचा आलेख विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर उभा केला.
एकविसाव्या शतकातील बदलत्या मराठी साहित्यविश्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप खरे यांच्या भूमिकेतून आजच्या तरुणाईच्या भावविश्वाला कवितेने दिलेला आवाज विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केला. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ इतिहासाचा मागोवा घेणारा न राहता मराठीच्या वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडणारा ठरला.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा अधिकृत दर्जा मिळाल्याचा टप्पाही विद्यार्थ्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केला. ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ या गीतावर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला भावनिक आणि सांस्कृतिक उंची प्राप्त करून दिली.
महानुभाव, वारकरी आणि समर्थ संप्रदायापासून शिवकाल, पेशवाई, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ आणि महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजच्या डिजिटल युगापर्यंतचा मराठी भाषेचा वैभवशाली प्रवास विद्यार्थ्यांनी वेशभूषा, अभिनय, संवाद आणि सादरीकरणाच्या माध्यमातून जिवंत केला. त्यामुळे उपस्थितांना मराठी भाषेच्या परिवर्तनशील प्रवासाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना माळी व गौरी बैरागी या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक टीका पाडवी यांनी केले. समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबरोबरच तिच्या भविष्यातील वाटचालीची जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या भाषेला आजचे वैभव एका दिवसात मिळालेले नाही. प्रत्येक कालखंडात कोणीतरी मराठीला वाचवले, जगवले, समृद्ध केले आणि पुढच्या पिढीकडे सोपवले. आज त्या परंपरेची धुरा आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रश्न केवळ ‘मराठीला अभिजात दर्जा मिळाला’ एवढाच नाही,तर आता प्रश्न आहेपुढे मराठीचे काय? तिचा अभिजातपणा टिकवण्यासाठी, तिचे वैभव वाढवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचे सामर्थ्य पोहोचवण्यासाठी आपण काय करणार? मराठीचे संवर्धन ही केवळ शासनाची किंवा साहित्यिकांची जबाबदारी नसून प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मराठी बोलणे, मराठीत वाचणे, मराठीत लिहिणे, मराठी साहित्य समजून घेणे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठीला सक्षमपणे पुढे नेणे, हीच अभिजात मराठीला खरी मानवंदना ठरेल, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, तसेच उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार पर्यवक्षक टी.एन. पाडवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रा. वर्षा घासकडबी , प्रा. प्रकाश चौधरी, प्रा. कृष्णा गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख सौ. मीनल वसावे तसेच प्रा.चंद्रकात देसले,प्रा.सुवर्णा गिरासे,प्रा.कन्हैया बोरसे, प्रा.योगेश ठाकरे, प्रा.अरूप गोस्वामी प्रा. निलेश भागवत प्रा. पवन सूर्यवंशी, प्रा. पुष्पराज पारधी, प्रा.नितीन अन्नदाते यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी साकारलेला हा कार्यक्रम म्हणजे केवळ मराठी भाषेच्या इतिहासाचे सादरीकरण नव्हते; तर ‘ज्यांनी मराठी घडवली, त्यांनी ती पुढे नेली,आता ती पुढे नेण्याची जबाबदारी आमची’, असा नव्या पिढीचा आश्वासक संदेश देणारा एक अर्थपूर्ण भाषिक दृश्य प्रवासाचा कार्यक्रम होता.



