*नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांनी घेतला रचनावादी शिक्षणपद्धतीचा अनुभव,आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांनी घेतला रचनावादी शिक्षणपद्धतीचा अनुभव,आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम*
*नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांनी घेतला रचनावादी शिक्षणपद्धतीचा अनुभव,आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग, निरीक्षण आणि प्रश्नांच्या माध्यमातून शिकण्यास प्रवृत्त करणार्या रचनावादी शिक्षणपद्धतीचा समृद्ध अनुभव अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम (आंध्रप्रदेश) येथे आयोजित चार दिवसीय विज्ञान व गणित कार्यशाळेत नंदुरबार जिल्हयातील शिक्षकांना मिळाला. निसर्गरम्य आणि शांत वातावरणातील या कॅम्पसमध्ये झालेल्या प्रशिक्षणातून विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन अधिक कृतीशील, विद्यार्थी-केंद्रित आणि आनंददायी कसे करता येईल, याची दिशा मिळाली. Constructivism या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला महत्त्व देत त्यांना निरीक्षण, प्रयोग, चर्चा आणि स्वतः निष्कर्ष काढण्याची संधी देण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेत 5E Instructional Model Engage, Explore, Explain, Elaborate Evaluate या 5 टप्प्यांचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करता येतो, हे प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आले. विषयाबद्दल कुतूहल निर्माण करून विद्यार्थ्यांना स्वतः शोध घेण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या अनुभवांच्या आधारे संकल्पना स्पष्ट करणे, या पद्धतीचा शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विज्ञानातील विविध Hands -on Experiments, गणितातील मनोरंजक कृती, वैज्ञानिक मॉडेल्सची निर्मिती, शैक्षणिक साहित्याचा वापर आणि प्रयोगशाळांना भेट यामुळे प्रशिक्षणातील सत्रे अनुभवसमृद्ध झाली. अमूर्त संकल्पना प्रत्यक्ष कृती व दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे सोप्या करता येतात, हे या उपक्रमांतून स्पष्ट झाले.
गणितातील संकल्पना खेळ, कोडी, आकृत्या, मोजमाप आणि तर्काधारित कृतींच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी गणिताचे अध्यापन अधिक कृतीआधारित करण्याची गरज अधोरेखित झाली.
वैज्ञानिक मॉडेल्सची निर्मिती आणि गटचर्चेमुळे सर्जनशीलता, निरीक्षण, संवाद व सहकार्याची कौशल्ये विकसित करण्याच्या पद्धतींची ओळख झाली. शाळेत उपलब्ध असलेल्या स्थानिक व कमी खर्चातील साहित्याचा वापर करून अशा विविध कृती राबविता येतील, ही बाब शिक्षकांसाठी विशेष उपयुक्त ठरली. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना आपल्या अध्यापन पद्धतीचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना तयार उत्तरे देण्याऐवजी प्रश्न विचारण्यास, अंदाज बांधण्यास, प्रयोग करण्यास आणि स्वतः निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करण्याचा निर्धार सहभागी शिक्षकांनी व्यक्त केला. शाळेत विज्ञान व गणिताच्या तासांमध्ये कृती, प्रयोग, गटकार्य आणि प्रश्नाधारित अध्यापनाचा अधिक वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेतील तज्ज्ञ मार्गदर्शक, फॅसिलिटेटर्स आणि अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संपूर्ण टीमच्या ज्ञानपूर्ण मार्गदर्शनाबद्दल सहभागी शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली. आत्मीय वातावरण, प्रभावी प्रशिक्षण पद्धती आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून मिळालेला अनुभव यामुळे 4 दिवसांचे हे प्रशिक्षण संस्मरणीय ठरले.
अनुभवातून शिक्षण, कृतीतून ज्ञान आणि प्रश्नांतून शोध हा कार्यशाळेचा गाभा असून, या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे आणि ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. कुप्पम येथे झालेल्या प्रशिक्षणात नंदुरबार जिल्ह्यातील श्रीमती प्रियंका अहिरराव (डाएट, नंदुरबार), सौ. मनीषा कलाल (एच.जी.श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार), संदीप आहेर (वनवासी विद्यालय, चिंचपाडा, ता. नवापूर), शरद ठाकरे (अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, कारेघाट, ता. नवापूर), सुनील नहिरे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा, कोळदे, ता. नवापूर), महेश माळी (आदर्श माध्यमिक विद्यालय, कुडावद, ता. शहादा), श्रीमती शीतल वाघ (जी. टी.पाटील कन्या हायस्कूल, तिलाली शनिमांडळ, ता. नंदुरबार), श्रीमती पौर्णिमा पाटील (कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, तर्हावद, ता. तळोदा), श्रीमती स्नेहांकिता पटेल (सद्गुरू विद्या प्रसारक मंडळ, मडकानी संचलित माध्यमिक विद्यालय, अनकवाडे- म्हसावद, ता. शहादा) यांचा सहभाग होता.



