*12 दिवस उलटूनही कठोर कायदेशीर कारवाई नाही; हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाचा इशारा, गणेश विसर्जन मिरवणुकीतील कथित वादग्रस्त देखाव्याची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*12 दिवस उलटूनही कठोर कायदेशीर कारवाई नाही; हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाचा इशारा, गणेश विसर्जन मिरवणुकीतील कथित वादग्रस्त देखाव्याची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी*
*12 दिवस उलटूनही कठोर कायदेशीर कारवाई नाही; हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाचा इशारा, गणेश विसर्जन मिरवणुकीतील कथित वादग्रस्त देखाव्याची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी*
तळोदा(प्रतिनिधी):-श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान नेमसुशील शाळेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त देखाव्याप्रकरणी निवेदन देऊन 12 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा दावा हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान थडग्याची प्रतिकृती तयार करून ती मिरवणुकीत सादर करण्यात आल्याचा तसेच काही विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून संबंधित देखाव्यात सहभागी करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला होता. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी उपलब्ध व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे आणि अन्य पुराव्यांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशीत संबंधितांची जबाबदारी किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास शाळा व्यवस्थापन, आयोजक अथवा जबाबदार व्यक्तींवर लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी तळोदा तहसीलदार दीपक धिवरे तसेच तळोदा तालुका पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले होते. धार्मिक मिरवणुकांमध्ये भविष्यात कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारे किंवा सामाजिक सलोखा व कायदा -सुव्यवस्थेवर परिणाम करणारे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी समितीने केली आहे.
‘लवकरात लवकर कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू,’ असा इशारा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि चौकशीअंती काय कारवाई केली जाते, याकडे तळोदा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी रोहित सूर्यवंशी, देवेंद्र गुरव, यश सूर्यवंशी, राजेंद्र मगरे, तुषार जोहरी, अजय ठाकरे, आकाश शिवदे, आकाश भोई, राहुल शिंदे, राजेंद्र जाधव, प्रशांत मराठे, तुषार चौधरी, देवसिंग वळवी, दीपक बिऱ्हाडे, एस. आय. मगरे, चिंतामण जोहरी, मनोज जोहरी, किशोर वाडिले, वैभव कर्णकार, संजय चव्हाण आदी निवेदन देण्याप्रसंगी उपस्थित होते.



