*1 ऑक्टोबर-जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षितता आणि सन्मानपूर्वक जीवनाचा संकल्प*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*1 ऑक्टोबर-जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षितता आणि सन्मानपूर्वक जीवनाचा संकल्प*
*1 ऑक्टोबर-जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षितता आणि सन्मानपूर्वक जीवनाचा संकल्प*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दरवर्षी 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातील अडचणी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि समाजातील त्यांच्या योगदानाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता, त्यांना वृद्धापकाळ चांगल्या पद्धतीने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, तसेच वृद्धापकाळातील आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरणस मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गौरव, आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व शासकीय योजनांची माहिती, कायदेविषयक जनजागृती, चर्चासत्रे व परिसंवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या 14567 या राष्ट्रीय हेल्पलाईनची माहिती लेखात दिली आहे.
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून 14567 क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन ‘एल्डरलाईन’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या टोल-फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना, कायदेशीर समस्या, बेघर ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्धांवरील अत्याचार यासंदर्भात माहिती, मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून देण्यात येते. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे. या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा / वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते. चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते. बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते. एल्डर लाईन 14567 हा क्रमांक टोल फ्री आहे. एल्डर लाईनचे कार्य आठवड्यातून सर्व दिवस सुरु असते.
हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असते. वर्षातील 362 दिवस सेवा सुरु असते (26 जानेवारी, 2 ऑक्टोंबर , व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी पूर्ण बंद असते.) हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे.



