*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याने सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नविन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचारा खाली आणणे जेणेकरुन संसर्गाची साखळी खंडीत होईल, यासाठी सन 2026-27 या वर्षात "कुष्ठरोग शोध अभियान" 2026(LCDC) 28 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 या कालावधीत एकुण 14 दिवस राबविण्याचे निश्चित केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शरीरावर संवेदनाहीन, लालसर किंवा फिकट रंगाचा चट्टा आढळल्यास संबंधित व्यक्ती कुष्ठरोगाची संशयित रुग्ण असू शकते. अशा व्यक्तींनी निदानासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात, आरोग्य उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे कुष्ठरोगामुळे होणारी विकृती टाळता येते. तसेच हा आजार उपचाराने पूर्णपणे बरा होतो. अंगावर पाचपेक्षा कमी चट्टे असल्यास साधारण सहा महिने, तर पाचपेक्षा अधिक चट्टे असल्यास 12 महिन्यांपर्यंत उपचार घेणे आवश्यक असते. आजाराकडे दुर्लक्ष केल्यास किंवा अंधश्रद्धेला बळी पडल्यास शारीरिक अपंगत्य निर्माण होण्याचा धोका असतो.
कुष्ठरोग शोध अभियान 2026 अंतर्गत कुष्ठरोगाचे लवकर निदान करून संशयित रुग्णांना तातडीने उपचाराखाली आणण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विनय सोनवणे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण संपुर्ण भाग व शहरी (निवडक भाग) यामध्ये कुष्ठरोग सर्वेक्षण व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हे अभियान दिनांक 28 सप्टेंबर 2026 ते 14 ऑक्टोबर 2026 असे एकूण 14 दिवस राबविण्यात येणार आहे. यामधे जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 18,01,700 लोकसंख्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी एकूण 1387 पथके प्रक्षिशीत करण्यात आलेले आहेत. सदर पथका मध्ये एक पुरुष व एक महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कुष्ठरोगाचे संशयित म्हणून नोंद घेऊन त्यांची तपासणी वैदयकिय अधिकारी यांचेकडून करुन निदान झाल्यावर त्यांना मोफत बहुविध औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध अभियान 2026 अंतर्गत डॉ. महेंद्र चव्हाण, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, (कुष्ठरोग) नंदूरबार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात तसेच सर्व तालुका स्तरावर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा / तालुका समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. समन्वय सभा, तपासणी पथक, आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. डॉ शशिकांत वसावे, वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिक्कट, लालसर व बधिर चटटा, त्या ठिकाणी घाम न येणे. जाड, बधिर, तेलकट/चकाकणारी त्वचा.
त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे. भुवयाचे केस विरळ होणे. डोळे पूर्ण बंद न करता येणे. तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा व जखमा असणे.
हाताची व पायाची बोटे वाकडी असणे. हात मनगटापासून व पाय घोटयापासून लुळा पडणे. त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे. हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे. कुष्ठरोगाचे निर्मूलन आणि आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात / तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गावागावांत प्रभातफेरी, शाळांमध्ये निबंध व रांगोळी स्पर्धा, कुष्ठरोगावरील म्हणी तसेच कुष्ठरोग प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. सोबतच आशासेविका आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी मोहिमेला सहकार्य करून स्वतःची तसेच कुटुंबातील सदस्यांची तपासणी करून घ्यावी व कुष्ठरोगाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींनी भीती न बाळगता तातडीने पूर्ण तपासणी करून घ्यावी आणि आवश्यक उपचार सुरू करावेत, असे आवाहन डॉ. महेंद्र चव्हाण, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, (कुष्ठरोग) नंदूरबार यांच्याकडून करण्यात आले आहे. डॉ. महेंद्र चव्हाण सहाय्यक संचालक, कुष्ठरोग, नंदूरबार



