*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
अहिल्यानगर(प्रतिनिधी):-नगरच्या मातीतलं विखे कुटुंब… आणि साता समुद्रापार स्वीडनच्या संसदेत पोहोचलेली नात!
महाराष्ट्राच्या राजकारणात विखे पाटील हे नाव नवीन नाही.
सहकार, शिक्षण आणि राजकारणाचा मोठा वारसा असलेल्या या कुटुंबाची एक वेगळीच कहाणी आता साता समुद्रापार पोहोचली आहे.
नीला विखे पाटील. महाराष्ट्रातील अहमदनगरशी घट्ट नातं असलेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्यांनी संसदेत प्रवेश केला आहे.
पण ही केवळ एका निवडणुकीची गोष्ट नाही. ही आहे एका राजकीय कुटुंबातून आलेल्या मुलीने परदेशात स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याची कहाणी! जन्म स्वीडनमध्ये, बालपण नगरच्या मातीत
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. मात्र त्यांच्या बालपणातील काही वर्षे अहिल्यानगर मध्ये गेली. त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्राची माती आणि दुसऱ्या बाजूला स्वीडनचे वातावरण—अशी दोन संस्कृती त्यांच्या आयुष्याचा भाग बनल्या. त्यांचे वडील डॉ. अशोक विखे पाटील हे शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून विखे पाटील फाउंडेशनशी संबंधित आहेत. नीला या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. तर महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
म्हणजेच अशी विखे कुटुंबाची पुढची पिढी आता स्वीडनच्या राजकारणात पोहोचली आहे.
शिक्षणही भारतापुरतं मर्यादित राहिलं नाही! नीला यांनी स्वीडन, स्पेन आणि युरोपातील विविध ठिकाणी शिक्षण घेतले. गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर माद्रिदमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॉम्प्लुटेन्स येथे एमबीएचे शिक्षण घेतले. त्यांना स्वीडिश, इंग्लिश आणि स्पॅनिश भाषांचे ज्ञान आहे. पण शिक्षणानंतर त्या केवळ नोकरीच्या मार्गावर गेल्या नाहीत त्यांनी राजकारणाची वाट निवडली. वयाच्या 16 व्या वर्षी राजकारणात प्रवेश!
नीला यांनी किशोरवयातच स्वीडनच्या राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व घेतल्याचे वृत्त आहे. पुढे त्या स्वीडनच्या ग्रीन पार्टीशी सक्रियपणे जोडल्या गेल्या आणि यंग ग्रीन्स, ग्रीन स्टुडंट्स तसेच पक्षाच्या स्थानिक संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. म्हणजे राजकारण त्यांच्यासाठी अचानक आलेली गोष्ट नव्हती, तरुण वयापासून त्यांनी त्या राजकीय व्यवस्थेत काम करत स्वतःचा प्रवास तयार केला.
पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्या!
राजकारणातील कामाचा अनुभव वाढत गेला आणि नीला यांना स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माजी पंतप्रधान स्टेफान लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी वित्त, करप्रणाली, अर्थसंकल्प आणि गृहनिर्माण यांसारख्या विषयांवर काम केले. त्यानंतर त्या स्टॉकहोमच्या स्थानिक राजकारणातही निवडून आल्या.
थेट स्वीडनच्या संसदेत! 2026 च्या स्वीडिश निवडणुकीत नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या 349 सदस्यांच्या संसदेत निवड झाली. हा क्षण केवळ विखे कुटुंबासाठीच नव्हे, तर महाराष्ट्राशी नातं असलेल्या लोकांसाठीही चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, निवडून आल्यानंतर नीला यांनी बालकल्याण आणि पर्यावरण या विषयांवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मतदानाचा अधिकार नसलेल्या लोकांचाही आवाज बनण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण नगरशी नातं अजूनही कायम, स्वीडनच्या संसदेत पोहोचूनही नीला आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रीय मुळांपासून दूर गेलेल्या नाहीत. त्यांनी भारताबद्दल आपल्याला खूप प्रेम आणि आपुलकी असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी असलेल्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या 15 वर्षांच्या असताना आजोबांनी त्यांना राज्याचा अर्थसंकल्प वाचायला दिला होता. आजोबांनी दिलेला तो राजकीय धडा, आणि आज नात स्वीडनच्या संसदेत! हीच कदाचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या राजकीय वारशाची वेगळी कहाणी आहे. अहिल्यानगर अर्थात तात्कालीन अहमदनगरच्या मातीत रुजलेलं विखे पाटील कुटुंब, आणि साता समुद्रापार स्वीडनच्या संसदेत पोहोचलेली त्यांची पुढची पिढी! नगर ते स्टॉकहोम, विखेंचा राजकीय प्रवास खरोखरच साता समुद्रापार पोहोचला!
त्यांना पुढील राजकीय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.



