*जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श, डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार;नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श, डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार;नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा*
*जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श, डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार;नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एखाद्या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा, पाठपुरावा करावा आणि त्यानंतर सन्मान मिळावा, अशी नेहमीची चौकट यावेळी मात्र मोडीत निघाली. कामाची दखल घेत, कोणताही प्रस्ताव मागवून न घेता निवड झालेला सन्मान नंदुरबारच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी यांचा गौरव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची राज्यस्तरावर पोहोचलेली दखल आणि नंदुरबारच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पुण्यातील नऱ्हे, नवले ब्रीज, पुणे येथील प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटतर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विघ्नेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड.शार्दूलराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शिक्षण संस्था, कुलगुरू, प्राचार्य आणि प्राध्यापकांमधून एकाची निवड करुन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांना आदर्श कुलगुरू पुरस्कार, मराठवाडा मित्र मंडळ, डेक्कन जिमखाना, पुणेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना आदर्श संस्थापक पुरस्कार, तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. पराग सदगीर यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी यांनी महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाला विद्यार्थ्यांचे पालकत्व देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा थेट संवाद वाढल्याने त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक अडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य झाले. महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीत नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात जीटीपी महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. सव्वा लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन महाविद्यालयाने केले असून त्यातून जवळपास सव्वासात लाख रुपयांहून अधिक महसूल महाविद्यालयाला प्राप्त झाला. या उत्पन्नातून महाविद्यालयात विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा निर्माण करण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर योग्य नियोजन, इच्छाशक्ती आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर केला तर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करता येतात, हा संदेश त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाला आहे. प्राचार्य डॉ. रघुवंशी यांना यापूर्वीही कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या कडून आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच इंडो थाई शैक्षणिक संस्थेकडून उत्कृष्ठ प्राचार्य व प्रशासक पुरस्कार, कोल्हापूरच्या करिअर कट्ट्याकडून उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार लोकमत तर्फे नंदुरबार आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य,विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर आता नुकताच राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, संस्थेचे संचालक मंडळ, अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे जीटीपी महाविद्यालयासह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



