*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शाळांचा सर्वांगीण व भौतिक विकास तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार 19 सप्टेंबर 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) मासिक बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने या बैठकींना प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे. या उपक्रमासंदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबार आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 नुसार शाळेच्या विकास प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग वाढविणे बंधनकारक आहे.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) प्रगतीवर पालक सभेद्वारे चर्चा, संभाव्य स्थलांतरित बालकांच्या पालकांच्या गृहभेटी घेऊन स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना, मे 2026 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार SMC चे पुनर्गठन, समिती सदस्यांच्या प्रत्यक्ष वर्गभेटी तसेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा व ठराव करण्यात येणार आहेत. बैठकीचा संपूर्ण अहवाल मुख्याध्यापकांनी केंद्रप्रमुखांमार्फत मिळणाऱ्या अधिकृत गुगल लिंकवर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. बैठका केवळ औपचारिक न ठेवण्याचे आवाहन - शाळा व्यवस्थापन समितीची मासिक बैठक ही केवळ औपचारिकता न राहता शाळा विकासाचे प्रभावी व्यासपीठ बनविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, अध्ययनातील अडचणी, शाळेच्या गरजा आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर यावर चर्चा करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराची माहिती पालकांसमोर मांडावी, तर पालकांनी घरातील अध्ययनाबाबत शिक्षकांशी नियमित संवाद साधावा. या समन्वयातून शाळेच्या गरजा व उपलब्ध साधनसंपत्तीचा विचार करून शाळा विकास आराखडा तयार करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी डायट नंदुरबार, शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार, पर्यवेक्षकीय यंत्रणा तसेच ‘ग्यान प्रकाश फाऊंडेशन’ यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणार आहे. शिक्षक, पालक, SMC आणि समाज यांच्या सहभागातून गावातील शाळा ‘आपली शाळा’ बनविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



