*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार अंतर्गत मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांचा सन्मान केला.
कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विषय शिक्षक जयंत उत्तरवार कृषि व्यवसाय व्यवस्थापन, उमेश पाटील कृषि अधिष्ठान, डॉ. वैभव गुर्वे - उद्यानविद्या, शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख, शास्त्रज्ञ विजय बागल तसेच मुक्त कृषि शिक्षण केंद्राचे सहाय्यक संदीप कुवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत तसेच व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत उत्तरवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात तत्त्वज्ञ आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शिक्षक दिन साजरा करण्यामागील भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे असलेले महत्त्व याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कृषि अभ्यासक्रमाचे विद्यार्थी महेंद्र कोकणी, सौ. भारती सामुद्रे व कु. सुरेखा पाडवी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी शिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन, ज्ञान आणि प्रेरणा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख मार्गदर्शन करताना राजेंद्र दहातोंडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शेती व कृषि पूरक व्यवसायांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. आजच्या बदलत्या काळात कृषि क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषि व्यवसाय आणि इतर कृषि पूरक उद्योगांचा अभ्यास करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेती व ग्रामीण विकासासाठी करून नवीन संधी निर्माण कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप कुवर यांनी केले. कार्यक्रमास कृषि अधिष्ठान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन व उद्यानविद्या या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



