*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
पुणे(प्रतिनिधी):-राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने 4 सप्टेंबर रोजी पुणे येथे भव्य व धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी होत आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला. या मोर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी केले. संच मान्यतेच्या प्रक्रियेत शिक्षकांच्या पदांवर होणारा परिणाम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेसमोरील विविध प्रश्नांकडे शासन व शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यात आले.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रॅक्टिकलची बॅच 40 विद्यार्थ्यांवरून 20 विद्यार्थ्यांची करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची एकाच बॅचमध्ये प्रात्यक्षिके घेतल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग प्रत्यक्ष करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील सुरक्षितता, उपकरणांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना मिळणारे प्रात्यक्षिक ज्ञान लक्षात घेता 20 विद्यार्थ्यांची बॅच करणे आवश्यक असल्याची भूमिका महासंघाने मांडली. कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापनाचे वेळापत्रक अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी 45 मिनिटांची तासिका 40 मिनिटांची करण्यात यावी, अशी मागणीही मोर्चाद्वारे करण्यात आली. तासिकेचा कालावधी 40 मिनिटे केल्यास वेळापत्रकाचे योग्य नियोजन, अध्यापनाचे व्यवस्थापन आणि उपलब्ध शैक्षणिक वेळेचा प्रभावी वापर करणे अधिक सुलभ होईल, अशी भूमिका शिक्षक महासंघाने मांडली.
या धडक मोर्चामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच विदर्भातून मोठ्या संख्येने कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक सहभागी झाले. विविध जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षक प्रतिनिधींनी एकजुटीने सहभाग घेत महासंघाच्या मागण्यांना भक्कम पाठिंबा दिला. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुका व जिल्हा पदाधिकारी तसेच महासंघाच्या सर्व सहकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे मोर्चाला मोठे यश मिळाले.
मोर्चात नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा सचिव प्रा.भरत चव्हाण, तालुका सदस्य प्रा.दर्शन सोनवणे, प्रा. निझरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी संच मान्यतेच्या प्रश्नासह शिक्षकांच्या पदांचे संरक्षण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, प्रॅक्टिकल बॅचची संख्या 20 करणे आणि 45 मिनिटांची तासिका 40 मिनिटांची करणे या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला.
मोर्चात महासंघाचे राज्य सरचिटणीस आदरणीय प्रा. लक्ष्मण रोडे, राज्य कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अविनाश बोर्डे, राज्य उपाध्यक्ष प्रा. रवींद्र भदाणे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. शिवराम सूर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष प्रा.डॉ.अशोक गव्हाणकर, सहसरचिटणीस प्रा.दिलीप शितोळे, राज्य समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर, प्रा. संतोष फाजगे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था वाडिया कॉलेजचे विश्वस्त डॉ. सचिन सानप यांनी केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल महासंघाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या आंदोलनाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही खंबीर पाठिंबा दिला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत आणि भगवान साळुंखे यांनी शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देत आंदोलनाला बळ दिले. तसेच संस्था प्रतिनिधी डॉ.सचिन सानप, कौस्तुभ गावडे आणि बब्रुवान रोंगे यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांना पाठिंबा दर्शविला. याशिवाय विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपैकी नरेंद्र काळे, शिवाजी खांडेकर आणि सुनील जगताप यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी सहकार्य केले.
या मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट आणि संघटित ताकद शासनासमोर प्रभावीपणे प्रदर्शित झाली. संच मान्यतेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर राज्यातील शिक्षक एकदिलाने एकत्र आले असून, त्यांच्या मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मोर्चाच्या यशानंतर महासंघाच्या वतीने राज्यभरातून सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बंधू- भगिनींचे, तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे तसेच महासंघाच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
“आपल्या सर्वांच्या या अभूतपूर्व एकजुटीचे ताकदवर दर्शन या मोर्चात घडले आहे. शिक्षकांच्या या बुलंद आवाजाचा निश्चितच सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी व्यक्त केला.



