*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, राजापूर तालुका शाखेची मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, राजापूर तालुका शाखेची मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, राजापूर तालुका शाखेची मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका राजापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी संघाच्या मुख्य कार्यालयातील वाघे हॉल, परळ, मुंबई येथे बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शाखाध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांच्या सूचनेनुसार शाखेचे उपाध्यक्ष संजय वारिक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. शाखेचे सरचिटणीस अनिल भोवड यांनी उपस्थित सभासद व समाजबांधवांचे हार्दिक स्वागत करून सभेला सुरुवात केली.
सुरुवातीला संघाचे संस्थापक कै. माळी गुरुजी, समाजनेते कै. शामरावजी पेजे तसेच दानशूर नेते कै. वाघे शेठ या त्रिमूर्तींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाखेचे खजिनदार कै. सोनू ठुकरूल यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करून शाखेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अहवाल सालात देवाज्ञा झालेल्या समाजबांधवांना शाखेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
व्यासपीठावर संघाचे सहसचिव व सभेचे निरीक्षक रवींद्र कुरतडकर, संघाचे उपाध्यक्ष ॲड. अवधूत तोरस्कर, राजापूर सन्मित्र पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकर तोरस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकर वारिक, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रत्नाकर रायकर, संघ प्रतिनिधी चंद्रकांत लिगम, खजिनदार जयवंत नाचणेकर, कुणबी युवा अध्यक्ष वैभव वालम, सचिव मनोहर नाडणकर, विवाह मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर, सहसचिव देवेंद्र पेटावे, संतोष जोगळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष परशुराम परवडे, युवा शाखेचे खजिनदार वैभव चौकेकर यांच्यासह पतसंस्थेचे आजी- माजी संचालक व बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. शाखाध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी दूरध्वनीद्वारे शाखा सचिव अनिल भोवड यांच्याशी संपर्क साधून सभेला शुभेच्छा दिल्या. तसेच संघ कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत बावकर, अरविंद डाफले व अशोक वालम हे कामानिमित्त बाहेर असल्याने सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनीही दिलगिरी व्यक्त करून सभेला शुभेच्छा दिल्या. सभेपुढील विषय, मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सहसचिव देवेंद्र पेटावे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यास सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली. वार्षिक अहवालाचे वाचन 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2026 या कालावधीतील शाखेच्या वार्षिक अहवालाचे वाचन शाखा सचिव अनिल भोवड यांनी केले. अहवालास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ताळेबंद व उत्पन्न खर्च पत्रकास मंजुरी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 अखेरचे ताळेबंद पत्रक व उत्पन्न-खर्च पत्रकाचे वाचन शाखेचे खजिनदार श्री. जयवंत नाचणेकर यांनी केले. त्यांनी शाखेचा वर्षभराचा आर्थिक हिशेब सभागृहासमोर सादर केला. त्यास सभागृहाने मंजुरी दिली. अंतर्गत हिशेब तपासणी अहवाल अंतर्गत हिशेब तपासणीस मनोज पुजारी यांनी हिशेब तपासणी अहवालाचे वाचन केले. अहवालास मंजुरी देण्यात आली. अंतर्गत हिशेब तपासणीसांची निवड सन 2026 -27 या वर्षासाठी अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून मनोज पुजारी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. मुलुंड विद्यार्थी वसतिगृह प्रवेश मुलुंड विद्यार्थी वसतिगृहातील प्रवेशाबाबत संघाकडून प्राप्त झालेली माहिती शाखा सचिव अनिल भोवड यांनी सभागृहास दिली. इच्छुक व गरजू विद्यार्थ्यांनी शाखेशी संपर्क साधून वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावर्षी राजापूर तालुक्यातून वसतिगृह प्रवेशासाठी एकच विद्यार्थी आला असून त्याला प्रवेश देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. सन 2027 ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यासाठी समाजबांधवांनी जाहिराती देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाखेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाखा सचिव अनिल भोवड यांनी संघामार्फत प्राप्त झालेला पत्रव्यवहार व महत्त्वाच्या सूचना सभागृहासमोर मांडल्या. उपस्थित समाजबांधवांनी विविध विधायक सूचना केल्या. त्यांची नोंद घेण्यात आली. अहवाल सालात ग्रामीण समितीमार्फत संघाचा एकही आजीव सभासद नोंदनी झाली नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली ग्रामीण शाखा पदाधिकारी व मुंबई पदाधिकारी यांची गणपती कालावधीत राजापूरला सभा घेऊन पुढील कामकाजाला गती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सभागृहातुन सूचना आल्या.
शाखेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल शाखेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सोगम यांनी वयोमानामुळे सध्या शाखेच्या सभांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने आपल्या जागी अन्य व्यक्तीची जबाबदारी देण्यात यावी, अशी विनंती केली. त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सभागृहाने त्यांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
सभागृहात झालेल्या चर्चेनंतर शाखेच्या उपाध्यक्षपदी प्रकाश डोंगरकर (मौजे खिणगिनी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच परशुराम परवडे यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. शाखेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
राजापूर शाखेच्या कार्याचे कौतुक
संघाचे निरीक्षक रवींद्र कुरतडकर यांनी आपल्या निरीक्षणात राजापूर शाखा ही संघाच्या सर्व शाखांमध्ये विविध बाबतींत अग्रेसर असून शाखेचे कामकाज संघाच्या घटनेला अधीन राहून शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले.
संघ संस्थापक माळी गुरुजी यांची राजापूर शाखा ही सर्व शाखांसाठी कायमच आदर्श राहिली आहे, असे नमूद करताना वरिष्ठ मंडळींकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आता तरुणांना अधिकाधिक संधी देणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. राजापूर शाखेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. राजापूर पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर तोरस्कर यांनी शाखेच्या सभासदसंख्येत वाढ करण्यासाठी मुंबईतील विरार, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी ठिकाणी बैठका आयोजित करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. शाखेच्या सभासदवाढीसोबतच पतसंस्थेच्या सभासदसंख्येत वाढ करण्यासाठीही सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सभाध्यक्ष संजय वारिक यांनी शाखेने वर्षभरात केलेल्या विविध कामांची माहिती देत युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन केले.
सभेच्या शेवटी शाखा सचिव अनिलजी भोवड यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त कुणबी युवकांच्या वतीने केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनिल भोवड यांनी उपस्थित सर्व समाजबांधव व युवकांचे मनःपूर्वक आभार मानले.
सभेचा समारोप व आभार प्रदर्शन देवेंद्र पेटावे यांनी केले. बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेली ही वार्षिक सर्वसाधारण सभा सामाजिक एकजूट, संघटनशक्ती आणि नव्या पिढीच्या सहभागाचा सकारात्मक संदेश देणारी ठरली.



