*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, कवायत संचालनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीपर भाषणे, शायरी व मार्गदर्शनाने कार्यक्रम रंगला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, कवायत संचालनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीपर भाषणे, शायरी व मार्गदर्शनाने कार्यक्रम रंगला*
*माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, कवायत संचालनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, देशभक्तीपर भाषणे, शायरी व मार्गदर्शनाने कार्यक्रम रंगला*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीमय वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत गावातून कवायत संचालन, देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली होती. भाषणे, शायरी आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या नवीन पायंडा व परंपरेनुसार दरवर्षी एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली. विद्यालयातून एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावणारी गुणवंत विद्यार्थिनी राजनंदिनी छगन पाडवी हिचे पालक छगन जोमा पाडवी यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या कार्याची माहिती दिली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची गाथा आपण कधीही विसरता कामा नये. हुतात्म्यांना सदैव नमन करून त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जपला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी जिगर संतोष राहसे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभावी भाषण करत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. त्याच्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. विद्यार्थिनी राधिका शेवाळे हिने देशभक्तीपर घोषणा आणि जोशपूर्ण शायरी सादर करून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. तिच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायत संचालनाने विशेष आकर्षण निर्माण केले. शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेले संचलन, विविध कवायती आणि देशभक्तीपर घोषणांनी विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्यातील शिस्त पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेत विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोमी ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास चंदन पवार, सरदार ठाकरे, सागर पवार, चुनीलाल नाईक, वाघुसिंग डुमकुल, प्रकाश ठाकरे, इच्छाराम नाईक, प्रल्हाद नाईक, चुनीलाल ठाकरे, दारासिंग, पोलीस पाटील सुरेश नाईक, तलाठी, ग्रामसेवक, प्रशासक डॉ. वाघ यांच्यासह ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयात करण्यात आलेली कॅलिग्राफी विशेष आकर्षण ठरली. उपशिक्षक फिरोज अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी शिक्षिका श्रीमती सुवर्णा कोळी यांच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट रेखाटन व कॅलिग्राफी साकारण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद राणे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार अनिल भामरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चंदू पाडवी, फिरोजअली सय्यद, अनिल भामरे, श्रीमती सुवर्णा कोळी, विजय पवार, सागर पाडवी, विनोद ठाकरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, शिस्तबद्ध कवायत संचालनामुळे आणि देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व संस्मरणीय वातावरणात पार पडला. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना आणि शिक्षणातून सक्षम नागरिक घडविण्याचा संकल्प या भावनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



