*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
*भांडुप येथे मराठीचा जागर,साहित्याचा जयघोष*
मुंबई(प्रतिनिधी):-भांडुप पूर्व येथे 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 ते सायं 6.30 या वेळेत रामानंद डी. ए. व्हि. विद्यापीठ सभागृहात "कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि स्वर्णिका पुस्तक प्रकाशन" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "2 रे राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलन" अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर घडविला. संमेलनाची सुरुवात पारंपरिक साहित्य दिंडीने झाली. मराठी साहित्याचा अभिमान आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीत साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काव्य मंचावर अक्षरश्री विलास देवळेकर यांनी डॉ प्रा केळुसकर सरांच्या आद्याक्षरावर साहित्य संमेलनाचे समावेश करून 6 फूट कविता फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, माजी मुंबई शेरीफ जगन्नाथ हेगडे, अनघा राणे, नमिता कीर, राजीव श्रीखंडे, अतुलचंद्र कुलकर्णी, निळकंठ श्रीखंडे, विद्या प्रभू, एन. डी. खान, यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी उपस्थित राहून साहित्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात देवळेकर लिखित "साहित्य संमेलनाचे स्वागत गीत," गायक आणि संगीतकार एकनाथ धयाळकर यांच्या सुरेल आवाजात गीत सादर केले. डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, सुकृत खांडेकर यांनी उपस्थित कवींना साहित्य, कविता, लेखनशैली आणि आधुनिक साहित्य प्रवाहावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी जिवबा केळुसकर यांनी राज्यभरातील नवोदित कवींसाठी एक दिवसीय कवी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला. साहित्य क्षेत्रात नव्या पिढीला सक्षम साहित्यमंच मिळावे, ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा अधिक व्यापक व्हावी, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. कवी विलास देवळेकर यांनी साहित्य संमेलनासाठी विशेष गीतरचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ज्येष्ठ कवी व पत्रकार शशिकांत सावंत यांच्यासह अनेक ज्येष्ठ कवींचे मार्गदर्शन नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत जिवबा केळुसकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमातील एक भावनिक क्षण म्हणजे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या दिवंगत पत्नींना वाहिलेली आदरांजली. कर्णिक यांच्या साहित्यिक आणि सामाजिक प्रवासात त्यांच्या पत्नींचा मोलाचा वाटा होता. या भावनेतून उपस्थित कवी, साहित्यिक आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून 'विनम्र अभिवादन' केले. संमेलनात उपस्थित कवी, साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते "सन्मानचिन्ह देऊन गौरव" करण्यात आला. तसेच, उपस्थित कवी आणि मान्यवरांना "ऑपरेशन सिंदूर, देश हा देव असे माझा, कोकणचे सौंदर्य" असे तीन 'काव्यसंग्रह भेट' देण्यात आले. माजी शिक्षणाधिकारी डॉ. प्रा. जिवबा केळुसकर यांचे "कौतुकास्पद कार्य" पाहून कोकण मराठी साहित्य परिषदचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ज्येष्ठ साहित्यिक यांनी "भांडुप शाखेवर अध्यक्ष" म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पूजा काळे व विद्या ठोंबे यांनी केले. त्यांच्या नेटक्या निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. समारोपप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी जिवबा केळुसकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यिक, कवी, रसिक, आयोजक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. एकूणच मराठी भाषेचा अभिमान, साहित्य संवर्धनाची तळमळ, नवोदितांना प्रेरणा, ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन आणि मराठी संस्कृतीचा गौरव अशा विविध पैलूंनी नटलेले हे "राज्यस्तरीय मराठी भाषा साहित्य संमेलन" साहित्य विश्वासाठी अविस्मरणीय ठरले आहे.



