*भारतीय संस्कृती आणि शिक्षणाचा सेतू मजबूत करण्यासाठी सीसीआरटीचा पुढाकार नवी दिल्लीत 514 व्या ओरिएंटेशन कोर्सला प्रारंभ;महाराष्ट्रातील शिक्षक गोपाल गावित यांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय संस्कृती आणि शिक्षणाचा सेतू मजबूत करण्यासाठी सीसीआरटीचा पुढाकार नवी दिल्लीत 514 व्या ओरिएंटेशन कोर्सला प्रारंभ;महाराष्ट्रातील शिक्षक गोपाल गावित यांचा सन्मान*
*भारतीय संस्कृती आणि शिक्षणाचा सेतू मजबूत करण्यासाठी सीसीआरटीचा पुढाकार नवी दिल्लीत 514 व्या ओरिएंटेशन कोर्सला प्रारंभ;महाराष्ट्रातील शिक्षक गोपाल गावित यांचा सन्मान*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी) यांच्या वतीने आयोजित 514 व्या ओरिएंटेशन कोर्सला नवी दिल्ली येथील सीसीआरटी मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. 9 जून ते 30 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सेवारत शिक्षक सहभागी झाले आहेत.
शिक्षण आणि भारतीय संस्कृती यांचा प्रभावी संगम घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी सीसीआरटीचे अध्यक्ष डॉ. विनोद नारायण इंदुरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला सीसीआरटीचे संचालक पप्पंजय कुमार यांच्यासह उपसंचालक डॉ. राहुल कुमार, उपसंचालक डॉ. संदीप शर्मा, उपसंचालक आशुतोष, उपसंचालक राम सरन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच क्षेत्र अधिकारी चंद्रमौली त्रिपाठी व क्षेत्र अधिकारी मिथुन दत्ता यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी सुश्री आयुषी गुप्ता, सहाय्यक विभाग अधिकारी, सीसीआरटी, नवी दिल्ली यांचीदेखील उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील सीसीआरटीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोपाल गावित यांनी ग्रामीण व आदिवासी भागात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या गोपाल गावित यांना दीप प्रज्वलनाचा मान देण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिक्षकाचा झालेला सन्मान हा राज्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरला.
उद्घाटनप्रसंगी उपसंचालक डॉ. संदीप शर्मा यांनी स्वागतपर भाषणातून अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. संचालक पप्पुंजय कुमार यांनी शिक्षणातील सांस्कृतिक समावेशकतेचे महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रीय शिक्षण धोरण- 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष डॉ. विनोद नारायण इंदूरकर यांनी उद्घाटनपर भाषणात भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही केवळ संस्थांची नव्हे तर शिक्षकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत उपक्रम
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये शिक्षण अधिक अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि संस्कृति संलग्न करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सीसीआरटीचा हा ओरिएंटेशन कोर्स शिक्षकांना भारतीय कला, संस्कृती, परंपरा आणि वारसा यांचे ज्ञान देऊन ते वर्गातील अध्यापनाशी जोडण्यास सक्षम बनवतो.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृतीचा सैद्धांतिक अभ्यास, कला आणि हस्तकलेतील प्रात्यक्षिक प्रशिक्षण, सांस्कृतिक घटकांचा समावेश असलेल्या पाठयोजना तयार करणे, अध्यापन- अध्ययन साहित्य निर्मिती, शैक्षणिक प्रकल्प, ऐतिहासिक स्मारके आणि संग्रहालयांना भेटी, तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे आणि विशेष कार्यक्रमांचा समावेश आहे.
कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेला चालना
प्रशिक्षणादरम्यान सहभागी शिक्षकांना पारंपरिक हस्तकला आणि लोककलेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या संसाधनांचा वापर करून कमी खर्चात प्रभावी अध्यापन साहित्य कसे तयार करता येते, याचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नवोपक्रम आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देऊ शकतील.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची प्रात्यक्षिक अनुभूती
या अभ्यासक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविध भागांतून आलेले शिक्षक एकत्र राहून आणि शिकून भारतीय संस्कृतीच्या बहुविध पैलूंचा अनुभव घेतात. विविध भाषा, परंपरा, कला प्रकार आणि सांस्कृतिक वारसा यांचा परस्पर परिचय होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. ‘भारतीय संस्कृतीतील प्रादेशिक योगदान’ या विशेष सत्रामध्ये विविध राज्यांतील सहभागी आपल्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख आणि योगदान इतरांसमोर मांडणार आहेत. यामुळे सांस्कृतिक विविधतेतून एकतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे.
वारसा संवर्धनाची जाणीव
अभ्यासक्रमात ऐतिहासिक स्मारके, संग्रहालये आणि निसर्ग उद्यानांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शिक्षकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची ओळख होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वारसा संवर्धनाची भावना विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रे आणि उपक्रमांची माहितीही दिली जाणार आहे.
शिक्षणातील संस्कृतीचा नवा अध्याय स्वामी विवेकानंद यांचे “शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासूनच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय” हे विचारवाक्य या अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. शिक्षणाला संस्कृतीशी जोडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून होत आहे.
देशभरातील शिक्षकांनी या अभ्यासक्रमाबाबत मोठा उत्साह व्यक्त केला असून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रशिक्षणविषयक ज्ञान व कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी काळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि भारतीय संस्कृतीचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.



