*आदिवासी युवा सेना संघटनेकडून नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी*
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्याची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी युवा सेना संघटनेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारास "इंडियन रॉबिनहुड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार" असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग.ह्यांना देण्यात आले. तसेच सदर निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथेही पाठविण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून आदिवासी इतिहास, संस्कृती, परंपरा आणि क्रांतिकारी वारशासाठी ओळखला जातो. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या जिल्ह्याने अनेक आदिवासी योद्धे, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक घडविले आहेत. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि योगदान जपण्यासाठी महान आदिवासी क्रांतिकारकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. जननायक टंट्या मामा भिल हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे महान आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांनी अन्याय, शोषण आणि अत्याचाराविरुद्ध संघर्ष करत गरीब, वंचित आणि शोषित जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. गरीबांना मदत करणारा लोकनायक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच त्यांना "इंडियन रॉबिनहुड" म्हणून संबोधले जाते.
नंदुरबार रेल्वे स्थानक (NDB) हे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असून जिल्ह्याचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. त्यामुळे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारास जननायक टंट्या मामा भिल यांचे नाव देण्यात आल्यास त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळेल. तसेच देशभरातून येणाऱ्या प्रवाशांना आदिवासी इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या भावना व जनभावना लक्षात घेऊन नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारास "इंडियन रॉबिनहुड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार" असे नामकरण करावे, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे. यावेळी रविंद्र वळवी, शिवदास सोनवणे, सुनिल पवार, राजेश ठाकरे, राहुल गावित, चिंचपाडा भिलाटी मित्र परिवार नंदुरबारचे, दिनेश वळवी, मुकेश ठाकरे, सुकलाल ठाकरे, सचिन ठाकरे, विशाल वसावे, अक्षय प्रधान यांच्यासह आदिवासी युवा सेना संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



