*पळसंबचा कोकमवाला शाळकरी मुलगा 12 वर्षीय वेदांत सावंतची धडपड कोकणी तरुणांसाठी प्रेरणादायी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पळसंबचा कोकमवाला शाळकरी मुलगा 12 वर्षीय वेदांत सावंतची धडपड कोकणी तरुणांसाठी प्रेरणादायी*
*पळसंबचा कोकमवाला शाळकरी मुलगा 12 वर्षीय वेदांत सावंतची धडपड कोकणी तरुणांसाठी प्रेरणादायी*
पळसंब(प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत, अशा काळात एका शाळकरी मुलानं रोजगार निर्मितीचा नवा धडा गिरवला आहे. मालवण तालुक्यातील पळसंब (वायंगणकर वाडी) येथील अवघ्या 12 वर्षांच्या वेदांत रवीकांत सावंत या शाळकरी मुलाने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. शाळा शिकता शिकता घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी वेदांत करत असलेली धडपड कोकणातील तरुणाईला निश्चितच प्रेरणा देणारी आहे.
वेदांत सध्या इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. त्याचे आई- वडील दोघेही शेतमजूर असून घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून वेदांत उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकम (अमसूल) निर्मितीच्या कष्टाच्या कामात स्वतःला झोकून देतो. रानातून रातांबे गोळा करणे, त्यातील पांढरा गर आणि बी बाजूला काढणे, रसापासून आगळ आणि कोकम सिरप तयार करणे, ही सगळी कामे तो अत्यंत कौशल्याने करतो. रातांब्याची सालं उन्हात 3 ते 4 दिवस वाळवावी लागतात. प्रत्येक वेळी ऊन देण्यापूर्वी ती कोकमाच्या रसात बुडवून पुन्हा वाळत घालावी लागतात. रणरणत्या उन्हात दररोज संध्याकाळी सुकलेली सालं गोळा करणे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा उन्हात घालणे, हे जिकिरीचे काम वेदांत न चुकता करतो. एवढेच नाही तर कष्टाने तयार झालेले कोकम वेदांत स्वतः आचरा येथील आठवडी बाजारात नेऊन विकतो. यंदा बाजारात कोकमाला प्रति किलो 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे. रातांबे गोळा करण्यापासून ते थेट बाजारात कोकम विकेपर्यंतची सर्व प्रक्रिया हा चिमुरडा एकटाच पार पाडतो आणि त्यातून मिळणारे पैसे आपल्या आईच्या हातात सुपूर्द करतो.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या वेदांतचे सध्या सोशल मीडियातून जोरदार कौतुक होत आहे. राजापूर तालुक्यातील ससाळे गावचे पत्रकार सुनील घुमे यांच्या माध्यमातून वेदांतची ही यशोगाथा समोर आली आहे. तुम्ही विकत घेणार वेदांतचे कोकम?
कष्टकरी वेदांतच्या या प्रामाणिक प्रयत्नांना आणि जिद्दीला समाजाच्या पाठबळाची गरज आहे. सुजाण नागरिकांनी आणि पर्यटकांनी वेदांतकडून अस्सल गावठी कोकम खरेदी केल्यास, त्याच्या कष्टाचे चीज होईल आणि या बालकाला पुढील शिक्षणासाठी व कुटुंबाला आर्थिक मदत लाभेल, असे आवाहन करण्यात येत आहे.



