*अक्कलकुवा तालुक्यातील ओघाणी-बगदा रस्ता खड्ड्यात; गरोदर माता व रुग्णांचे हाल,युवा क्रांती संघटना आक्रमक
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुक्यातील ओघाणी-बगदा रस्ता खड्ड्यात; गरोदर माता व रुग्णांचे हाल,युवा क्रांती संघटना आक्रमक
*अक्कलकुवा तालुक्यातील ओघाणी-बगदा रस्ता खड्ड्यात, गरोदर माता व रुग्णांचे हाल,युवा क्रांती संघटना आक्रमक*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू असतानाही अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओघाणी ते बगदा या रस्त्याला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. हा रस्ता आहे की खडकाळ माळरान, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. या मार्गाच्या तातडीने दुरुस्तीसाठी 'युवा क्रांती नंदूरबार सामाजिक संघटने'ने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या 7 दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र रस्ता रोको किंवा कार्यालय टाळेबंदी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या वतीने कार्यकारी उप अभियंता (सा.बा. विभाग) आणि तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
ओघाणी ते बगदा हा मार्ग परिसरातील अनेक आदिवासी पाड्यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र, रस्त्यावर पडलेले अणकुचीदार दगड आणि मोठमोठ्या खड्ड्यांमुळे येथून रुग्णवाहिका नेणेही अशक्य झाले आहे. विशेषतः गरोदर माता आणि गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही दररोज जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागत आहे. युवा क्रांती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. रुपसिंग तडवी आणि तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे यांनी पदाधिकाऱ्यांसह सदर मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्याची अवस्था अत्यंत भीषण असल्याचे निदर्शनास आले. शासनाकडून दरवर्षी रस्ते विकासासाठी मोठा निधी येतो, मग या रस्त्याबाबतच सार्वजनिक बांधकाम विभाग इतका उदासीन का, असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
पावसाळा तोंडावर असल्याने या रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. रस्त्यावरील विखुरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर वेळेत दुरुस्ती झाली नाही, तर पावसाळ्यात या दुर्गम भागाचा जिल्ह्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन मिळाल्यापासून 7 कार्यदिवसांच्या आत कामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन संघटनेने मागितले आहे. अन्यथा होणाऱ्या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे युवक क्रांतीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. रुपसिंग तडवी व धिरसिंग वसावे यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे. यावेळी सुनील वसावे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



