*नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा पुढाकार; वाहतूक कोंडी आणि वादावर कायमस्वरूपी तोडगा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा पुढाकार; वाहतूक कोंडी आणि वादावर कायमस्वरूपी तोडगा*
*नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा पुढाकार; वाहतूक कोंडी आणि वादावर कायमस्वरूपी तोडगा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात दर रविवारी भरणारा बाजार आता रेल्वे रुळापलीकडील उड्डाणपुलाखाली स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासोबतच, 'दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व्यावसायिकांना पालिकेमार्फत अधिकृत परवाने दिले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
रविवार बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि स्थानिक व्यापारी संकुलातील दुकानदारांशी होणारे वाद मिटवण्यासाठी बुधवारी पालिकेत आमदार रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांसह पालिकेचे अधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.
बाजाराच्या नवीन ठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाला जागा निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी पांढरे पट्टे मारले जाणार असून, व्यावसायिकांना केवळ त्याच मर्यादेत आपले दुकान थाटावे लागेल. या जागेसाठी व्यावसायिकांना ठराविक शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल. या निर्णयामुळे रविवार बाजारातील कटलरी, कपडे, खेळणी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शहराच्या मुख्य भागातील वाहतूकही मोकळी होणार आहे. "रविवार बाजार हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना रोजगार मिळावा आणि नागरिकांनाही त्रास होऊ नये, असा सुवर्णमध्य आम्ही साधला आहे. परवाने मिळाल्यामुळे व्यावसायिकांना आता कायदेशीर संरक्षण मिळेल," असे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.