*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
*नायगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी 338 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा*
नांदेड(प्रतीनिधी):-न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा होऊन नागरिकांना सुलभ व स्वस्त न्याय मिळावा या उद्देशाने नायगाव येथील न्यायालयात शनिवार, 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. जी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तालुका विधी सेवा समिती, नायगाव (बा.) यांच्या वतीने आयोजित या लोकअदालतीचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा समिती अध्यक्षा श्रीमती ए. टी. गित्ते यांनी भूषविले. लोकअदालतीत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार प्रलंबित दिवाणी प्रकरणांपैकी 19 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. यामुळे संबंधित पक्षकारांना दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळाला.
याशिवाय दाखलपूर्व प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोटिसा देण्यात आल्या होत्या. एकूण 2940 नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यापैकी 288 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांतून एकूण 61 लाख 77 हजार 290 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच गुन्हा कबुली स्वरूपातील 31 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामधून 6 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोकअदालतीमुळे प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होऊन नागरिकांना सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाला बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती ए. टी. गित्ते यांनी विशेष पुढाकार घेतला. अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रम्हे आणि सचिव एस. जी. देशपांडे यांनीही आवश्यक मार्गदर्शन केले. लोकअदालतीसाठी पॅनल विधीज्ञ म्हणून अॅड. एस. व्ही. पवळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तालुका विधीज्ञ संघ नायगावचे अध्यक्ष एल. एस. तुमेदवार आणि सचिव एस. बी. कदम यांच्यासह इतर वरिष्ठ विधीज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तालुक्यातील विविध बँका, पंचायत समिती नायगाव तसेच इतर संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करत मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकअदालतीच्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करून घेतला.



