*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-एस.ए. एम.ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2026 मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य पराग पोळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक सबस्टीन जयकर उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख सौ. शालिनी नेरकर, सर्व शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वरील मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व शाळेसाठी पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मराठी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. त्यानंतर प्रणव चंद्रात्रे, जिगिशा पाटील, जिया जैन व हर्षाली शिरसाठ यांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद करत मनोगत व्यक्त केले. स्मृणा नाटेकर हिने सादर केलेल्या कवितेने वातावरण भारावून गेले.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी ‘मराठी साहित्याची ओळख’ ही नाटिका सादर करून संत साहित्य, आधुनिक साहित्य आणि विविध नामवंत साहित्यिकांची माहिती प्रभावीपणे मांडली. मराठी विषय शिक्षक सुज्ञान वळवी यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा व आजच्या काळातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
शाळेचे प्राचार्य पराग पोळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी ही केवळ भाषा नसून आपल्या संस्कृतीची ओळख आहे, असे सांगून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा व भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 23 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘मराठी सप्ताह’ साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन मराठी विभागाच्या प्रमुख सौ. शालिनी नेरकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
23 फेब्रुवारी रोजी मराठी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी पोस्टर बनविणे स्पर्धा व कविता गायन स्पर्धा घेण्यात आली. 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
26 फेब्रुवारी रोजी इयत्ता आठवीसाठी मराठी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि अभिमानाची भावना दृढ झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शालिनी नेरकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन मराठी विषय शिक्षिका मोनाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विषय शिक्षिका सौ. शालिनी नेरकर, मोनाली पाटील, मनीषा झाल्टे, हर्षा साळी, मराठी विषय शिक्षक सुज्ञान वळवी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



