*सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा;31 फुटी त्रिशूल स्थापना, सरकार साहेब रावल यांच्याहस्ते तापी घाटावर महाआरती व स्व. डॉ. चि. अभिषेक राजपूत सभागृहाचे लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा;31 फुटी त्रिशूल स्थापना, सरकार साहेब रावल यांच्याहस्ते तापी घाटावर महाआरती व स्व. डॉ. चि. अभिषेक राजपूत सभागृहाचे लोकार्पण*
*सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा;31 फुटी त्रिशूल स्थापना, सरकार साहेब रावल यांच्याहस्ते तापी घाटावर महाआरती व स्व.डॉ.चि.अभिषेक राजपूत सभागृहाचे लोकार्पण*
शिरपूर(प्रतिनिधी):-श्री तीर्थक्षेत्र महादेव मंदिर, तापी घाट, सावळदे येथे दि.13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तीन दिवस तापी घाट परिसर भक्तिरस, उत्साह आणि जल्लोषाने भारावून जाणार असून पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यात्रेची सुरुवात दि. 13 फेब्रुवारी रोजी लोकनाट्य तमाशा सम्राट भीमा नामा अंजाळेकर यांच्या सादरीकरणाने होणार आहे. पारंपरिक लोककलेचा हा बहारदार कार्यक्रम यात्रेच्या पहिल्याच दिवशी वातावरण रंगतदार करणार असून ग्रामीण संस्कृतीची झलक अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. धनश्री भडगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रभावी वाणीमधून भाविकांना भक्तिरसाचा लाभ मिळणार आहे.
महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत भव्य त्रिशूल शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ढोल- ताशांच्या गजरात, जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेत ही शोभायात्रा गावातून मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते 11.30 या वेळेत 31 फुटी भव्य त्रिशूल व कलश स्थापना विधिवत पार पडणार आहे. यावेळी शिवलिंग पूजन, कळस स्थापना तसेच महादेव मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचे विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
याच दिवशी श्री वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. योगेश महाराज चिंचोलीकर यांचे कीर्तन होणार असून महाशिवरात्रीचा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
दि.15 फेब्रुवारी 2026 पासून तापी घाट सावळदे येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सरकार साहेब रावल यांच्या शुभहस्ते महाआरती सुरू होणार असुन हा पायंडा ऐतिहासिक ठरणार आहे. तर महाशिवरात्री पासुन तापी मातेच्या भव्य महाआरतीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. खान्देशात प्रथमच तापी मातेची विशाल आरती होणार असून मातेचा साडी-चोळी व नारळ अर्पण करून सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे तापी घाट धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने नवीन ओळख निर्माण करणार असल्याचे बोलले जात आहे. या यात्रेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे केवलसिंग बन्सीलाल राजपूत यांच्या वतीने स्वर्गीय डॉ. चिरंजीव अभिषेक राजपूत यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे नामकरण व लोकार्पण सोहळा. या प्रसंगी राजपूत परिवाराच्या दातृत्वाचा सन्मान समस्त सावळदे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान आकर्षक लेझर लाईट शो देखील सादर करण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान भाविकांसाठी तापी नदीकाठी नौकाविहार (बोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन स्टॉल, रक्तदान शिबिर आणि शासकीय वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. तर भविष्यात विशाल खान्देशात तापी घाटाला भव्य असा सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक ओळख मिळवून देण्याचा मानस सावळदे येथील उपसरपंच तथा पॅनल प्रमुख गटनेते सचिन पदमसिंग राजपूत यांनी केला आहे. तर सावळदे गाव राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. तरी या भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास माता- भगिनी, युवक मंडळे तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ सावळदे (ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.



