*जी. टी. पाटील महाविद्यालयात मराठी विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात मराठी विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात मराठी विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या मराठी अभ्यास मंडळ व जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष मराठी विषयाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा शैक्षणिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी,
“आजच्या शिक्षणपद्धतीत अभ्यासक्रम हा केवळ पुस्तककेंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित, समाजाभिमुख आणि काळानुरूप असणे अत्यावश्यक आहे. समाजातील बदल, नव्या पिढीच्या गरजा व रोजगाराभिमुखता यांचा अभ्यासक्रमात समतोल साधणे ही आजची गरज आहे,” असे परखड मत व्यक्त केले. मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक जाणिवा व चिकित्सक विचारशक्ती विकसित व्हायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “आजचे युग हे अत्यंत स्पर्धात्मक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्ये, भाषिक प्रावीण्य आणि आत्मविश्वास देणारा अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे शिक्षण आकर्षक व उपयुक्त पद्धतीने दिल्यास विद्यार्थ्यांचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलेल,”
असे प्रतिपादन केले. अभ्यासक्रम पुनर्रचनेत भाषा, रोजगार आणि स्पर्धा यांचा योग्य मेळ घालण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कार्यशाळेतील प्रमुख वक्ते प्रा. डॉ. फुला बागुल यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात, “मराठी अभ्यासक्रमात स्थानिक बोलीभाषांचा समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोली ही भाषेची जिवंत रूपे आहेत. तसेच एम. पी.एस.सी. व यु. पी.एस.सी. च्या धर्तीवर व्याकरण, भाषिक कौशल्ये व लेखन कौशल्यांचा सखोल समावेश अभ्यासक्रमात व्हावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी अधिक सक्षम होतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या दोन्ही सत्रातील प्रमुख वक्ते प्रा. डॉ.वासुदेव वले, प्रा.डॉ.माणिक बागले, प्रा.डॉ. सचिन पाटील यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. आर. डी. पाटील, डॉ. संजय महाले, डॉ. किशोर पाठक, डॉ. एम. एल. भुसारे, डॉ. विलास पंडित, डॉ. मोरेश्वर नेरकर, डॉ. मोरे, प्रा. शिवराम गायकवाड, डॉ. अतुल देशमुख यांनी अभ्यासक्रमाबाबत आपले मौलिक विचार व सूचनांची मांडणी केली.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुलतान पवार यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे, गरज व रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक डॉ. माधव कदम यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन प्रा. रुपाली जगताप यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. मनोज शेवाळे, प्रा. शशिकला नाईक, प्रा. डॉ. महेंद्र गावीत, प्रा. प्रल्हाद वसावे, प्रा. प्रमेश वसावे व प्रा. माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी मराठी विषयातील बहुसंख्य प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभ्यासक्रम पुनर्रचनेसाठी झालेली ही कार्यशाळा मराठी विषयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर घालणारी ठरली, असा सर्वसाधारण सूर उपस्थितांमध्ये दिसून आला.



