*तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात तोतया योगीविरोधात कारवाईची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात तोतया योगीविरोधात कारवाईची मागणी*
*तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात तोतया योगीविरोधात कारवाईची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तोरणमाळ येथील प्राचीन श्री गोरक्षनाथ मंदिर परिसरात स्वयंघोषित योगी म्हणून वावरणाऱ्या संजीवनाथ नावाच्या व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच परिसरातील सार्वजनिक शांतता अबाधित ठेवावी, अशी मागणी मंदिराचे विश्वस्त व स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, श्री गोरक्षनाथ मंदिराशी कोणताही अधिकृत अथवा कायदेशीर संबंध नसताना सदर व्यक्ती स्वतःस योगी संबोधून भाविकांकडून देणग्या उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदिर परिसरात परस्पर बारकोड (क्यूआर कोड) लावून देणग्या स्वीकारणे, दानपेटीतील रक्कम अपहार करणे तसेच मंदिराच्या नावाखाली गैरलाभ मिळवणे, असे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप विश्वस्तांनी केला आहे. याशिवाय, भाविकांना पूजा- अर्चा करण्यास अडथळे निर्माण करणे, प्रश्न विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, तसेच मंदिराच्या पावित्र्यावर परिणाम होईल असे वर्तन केल्यामुळे परिसरात तीव्र रोष निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद आहे. काही साध्वी महिलांना मंदिर परिसरात किंवा वाहनातून बोलावून अश्लील वर्तन केल्याचे आरोपही करण्यात आले असून त्यामुळे जनमानसात असंतोष पसरला असल्याचे सांगण्यात आले आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित तोतया योगीविरोधात उत्तर प्रदेश राज्यात हद्दपारीची कारवाई झाल्याची माहिती असून तो सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक बळाच्या जोरावर कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, तोरणमाळ परिसरातून संबंधित व्यक्तीची हाकलपट्टी करून मंदिराचे पावित्र्य जपावे व सार्वजनिक शांतता प्रस्थापित करावी, असे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर गोरक्षनाथ मंदिर तोरणमाळचे अध्यक्ष आर. पी. चौधरी, सरपंच इंदाबाई (तोरणमाळ), अरविंद बागुल, राजेंद्र इंगळे, रोहिदास चौधरी, जीवन रावताडे, रतीलाल नाईक व संतोष चौधरी यांच्या सह्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी प्रशासन कोणती कारवाई करते याकडे परिसरातील भाविक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.



