*नंदुरबार जिल्ह्यात सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा*
*नंदुरबार जिल्ह्यात सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षणातून स्वयंरोजगाराला नवी दिशा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय सोलर आधारित अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व विज्ञान आश्रम, पाबळ (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून माननीय दीपक पटेल, प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागामध्ये सोलर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात उद्योग उभारण्याची मोठी संधी असून महिलांनी व युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी म्हणून तानाजी खर्डे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग नंदुरबार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अन्नप्रक्रिया क्षेत्रात सोलर ड्रायरचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा वाढतो, साठवण क्षमता सुधारते आणि शेतमालाचे नुकसान कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, उमेश पाटील, तसेच विज्ञान आश्रमाचे डेप्युटी डायरेक्टर डॉ. रणजीत श्यामबाग, प्रसाद पाटील (प्रोग्राम ऑफिसर) आणि कु. ज्ञानेश्वरी वारुळे (फेलो) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत उत्तरवार, शास्त्रज्ञ (कृषीअभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले. त्यांनी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामान लक्षात घेता सोलर ड्रायर उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. आरती देशमुख गृहविज्ञान शास्त्रज्ञ यांनी प्रभावी व सुसूत्रपणे केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, तळोदा व शहादा तालुक्यातील महिला, युवक व बचत गट प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रामध्ये विज्ञान आश्रमाचे डॉ. रणजीत श्यामबाग, प्रसाद पाटील, कु. ज्ञानेश्वरी वारुळे तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या सौ. आरती देशमुख यांनी सोलर तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्रात सोलर ड्रायरचे प्रकार, त्याची रचना, कार्यपद्धती, वेगवेगळ्या भाज्या व फळांना लागणारा कालावधी, सोलर ड्रायरमध्ये सुकविलेल्या पदार्थांचा दर्जा, उत्पादन खर्च, नफा–तोट्याचे आर्थिक गणित, तसेच मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यासोबतच हिरवी पालेभाजी, कांदा, टोमॅटो, मिरची, शेवगा, आंबा, केळी इत्यादींच्या सोलर ड्रायिंग पद्धती, त्यांचे योग्य पॅकेजिंग मटेरियल, लेबलिंग, साठवण व विक्री पद्धती याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांना घरगुती पातळीवर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, आत्मविश्वास व दिशा मिळाली असून भविष्यात महिला बचत गट व युवकांच्या माध्यमातून सोलर आधारित अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास चालना मिळणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती या उद्दिष्टांना बळ मिळाले असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.



