*जी.टी.पाटील महाविद्यालयातील रासेयोच्या विशेष हिवाळी शिबीरात विविध उपक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयातील रासेयोच्या विशेष हिवाळी शिबीरात विविध उपक्रम संपन्न*
*जी.टी.पाटील महाविद्यालयातील रासेयोच्या विशेष हिवाळी शिबीरात विविध उपक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकाकाचे ‘विशेष हिवाळी शिबीरा’चे आयोजन केवडीपाडा या गावात करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कबचौउमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.डॉ.एम. जे.रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवकांसाठी दररोज सकाळी प्रार्थना, योग व व्यायाम घेण्यात आले. दररोजच्या श्रमदानाअंतर्गत केवडीपाडा गावालगतच्या नदीमध्ये स्वंयसेवकांनी पाणी अडवण्यासाठी तीन छोटे बंधारे बांधले. गावातला मुख्य रस्ता, मंदिर, जिल्हा परिषद मराठी शाळा, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या परिसरात साफसफाई केली. ब्लॉक झालेला नाला पूर्णत: साफ केला. रस्त्यावर आलेली काटेरी झुडुपे तोडून रस्ता मोकळा केला. गावशिवारातील अजिपाळ परिसरातील प्लास्टिकचे संकलन करून नष्ट केले.
दररोजच्या बौद्धिक सत्रात प्रा.डॉ. मधुकर देसले यांनी सामाजिक कार्यात युवकांची भूमिका किती महत्वाची आहे याची अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले. सुभाष कोकणी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. रणजित राजपूत यांनी थॅलेसेमिया या आजाराविषयी जागृती केली. डॉ. स्वप्नील मिश्रा यांनी सायबर सेक्युरिटीची माहिती देताना त्यातील धोके विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जीवन पाटील यांनी पत्रकारितेतील विविध संधी, समाजासाठी पत्रकारितेचे महत्त्व या विषयाची अभिव्यक्ती केली. डॉ.माधव कदम यांनी ‘श्यामची आई’तील ‘श्यामचे पोहणे’ विषयावर कथाकथन करत युवकांना संस्काराची माहिती दिली. डॉ.मिनाक्षी जगताप यांनी माणसाच्या आयुष्यातील मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ.आशा तिवारी यांनी महिला विषयक कायदयाची माहिती देऊन स्त्री-पुरुष समता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.दीपक अहिरे यांनी आजच्या काळातील सेंद्रिय शेतीचे महत्त्व स्पष्ट करत युवकांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. उप कृषी अधिकारी करणसिंग गिरासे यांनी मृदा संवर्धनाचे महत्त्व सांगत मृदा संवर्धन केले नाही भविष्यात प्रचंड हानी होणार असल्याचे स्पष्ट केले. सिव्हील हॉस्पिटलच्या रेड रिबीनचे समुपदेशक हरपाल जाधव यांनी युवकांना आणि गावातल्या नागरिकांना एचआयव्ही बद्दल माहिती दिली. दामिनी पथकच्या ज्योती पाटील आणि सायबर सेक्युरिटी सेलचे किरण जिरेमाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर गुन्ह्याच्या स्वरूपाविषयी माहिती देत युवकांना या क्षेत्रात सजग राहण्याचे आवाहन केले. वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी आणि अंधश्रद्धाविषयक जागृती करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलनचे कीर्तीवर्धन तायडे, वसंत वळवी आणि त्यांच्या टीमने जादूटोण्याच्या वेगवेगळ्या प्रयोगाचे सादरीकरण केले. राजेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहयोग विषयी मार्गदर्शन करत मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून सांगितले. शिबिरातल्या बौद्धिक सत्राचे सुत्रसंचलन, पाहुणे परिचय, आभार, कार्यक्रम नियोजन या गोष्टी स्वयंसेवकांनी स्वत: केल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढीस लागून, त्यांनी व्यवस्थापनाचे धडे घेतले. स्वयंसेवकांनी गावात स्वच्छताविषयक, मतदान जागृतीविषयक, पर्यावरण संवर्धन विषयक आणि आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी रॅली काढली. शिबिरात सेवा ब्लड फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण वीस स्वयंसेवक आणि एनएसएस कार्यक्रम अधिकारी यांनी रक्तदान केले. रांगोळी, पोस्टर, चित्र तयार करून स्वयंसेवकांनी आरोग्य, पर्यावरण, पाणी, शिक्षण या सारख्या विषयांवर जागृतीचा संदेश दिला. गटचर्चा आणि विविध खेळातल्या मनोरंजनातून सामूहिकतेचे महत्त्व, एकाग्रता, शरीर संवर्धन, विश्वास या मूल्यांची स्वयंसेवकांना जाणीव झाली. सांकृतिक कार्यक्रम अंतर्गत लोकनृत्य, पथनाट्य, विंडबन, मुकनाटय, बॉलीवूड डान्स, गीतगायन, मिमिक्री या कलाप्रकारांतून स्वयंसेवकांनी आपल्या अंगी असलेल्या कलेचा आविष्कार केला. शिबिरात वेगवेगळ्या राबविलेल्या उपक्रमांचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुलतान पवार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. संगिता पिंपरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.जितेंद्र पाटील, डॉ.माधव वाघमारे आणि एनएसएसचे स्वयंसेवक यांनी केले.



