*अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सव, स्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सव, स्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान*
*अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सव, स्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांची जाणीव, समान संधी व सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन नंदुरबार येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन, नंदुरबार येथील सभागृहात वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच मार्गदर्शक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी आशा सांघवी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एजाज बागवान, मौलाना जकेरीया व अमिन कुरैशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनाचे महत्त्व विशद करत आयोजित स्पर्धांमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. यानंतर झालेल्या विद्यार्थी मनोगत कार्यक्रमात काजी निदा फातेमा, लायबा सैय्यद, फहमिना शाह, अतिफा मोमीन, आमेना सैय्यद, कादीर अन्सारी व दानिश कुरैशी यांनी आत्मविश्वासपूर्ण व विचारप्रवर्तक मते मांडून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे विजय सैंदाणे यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक व पायाभूत विकासाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी “अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांचा लाभ पात्र घटकांपर्यंत पोहोचवणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे” असे प्रतिपादन करत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी अल्पसंख्यांक विकासाच्या विविध योजनांची माहिती दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वक्तृत्व, भित्तीपत्र व निबंध स्पर्धांमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
तालुकास्तरावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य फैय्याज पठाण, हरीष बोरसे, रफिक जहांगीरदार, जव्वाद सैय्यद, सत्यजित नाईक, कालिदास पाठक, इसरार सैय्यद व मुदब्बीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशफाक इनामदार व जव्वाद कुरैशी यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमातील विशेष व भावस्पर्शी बाब म्हणून दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असूनही वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या रहेबर शाळा, नंदुरबार येथील विद्यार्थी मोहम्मद दानिश कुरैशी यांचा अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत 1100 रुपये रोख रकमेने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या जिद्द, आत्मविश्वास व प्रेरणादायी सहभागाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे डॉ. युनूस पठाण यांनी केले तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी लक्ष्मण कोकणी, संतोष बोधडे व मनीष सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.



