*नांदेडच्या माजी महापौर जयश्री पावडे व उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचा भाजपात प्रवेश, ना.चंद्रशेखर बावनकुळे,खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नांदेडच्या माजी महापौर जयश्री पावडे व उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचा भाजपात प्रवेश, ना.चंद्रशेखर बावनकुळे,खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश*
*नांदेडच्या माजी महापौर जयश्री पावडे व उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांचा भाजपात प्रवेश, ना.चंद्रशेखर बावनकुळे,खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश*
नांदेड(प्रतिनिधी):-भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून या पक्षाकडे तिकीट मागण्याचा मोठा लोंढा सुरू असतानाच या पक्षाने काँग्रेस व मनसेला खिंडार पाडले आहे. नांदेडच्या माजी महापौर जयश्री नीलेश पावडे व माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह मनसेच्या विनोद पावडे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या समन्वय समितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत उभय नेत्यांनी भाजपा विजयाचा प्रमुख पदाधिकार्यांना कानमंत्र दिला. कुठलीही निवडणूक सोपी न समजता सूक्ष्म नियोजन करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची ताकद ही शहरातील सामान्य नागरिक असून त्यांच्या समस्या भारतीय जनता पक्षाच्या ट्रीपल इंजीन सरकारमार्फतच सोडविल्या जाऊ शकतात, असा विश्वास आपण त्यांना देणे गरजेचे आहे. तिकीट वाटपात जिंकण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष असणार आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुक आहेत. त्यातील एकाला संधी मिळत असताना इतरांना पक्षाच्या अन्य जबाबदार्या देऊन त्यांचाही योग्य सन्मान करण्यात येईल, असे यावेळी उभय नेत्यांनी सांगितले. यानंतर बैठकीच्या शेवटी माजी महापौर जयश्री नीलेश पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, मनसे नेते विनोद पावडे, अॅड.नीलेश पावडे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे भारतीय जनता पक्षाची शहरातील असलेली ताकद यामध्ये अधिकची भर पडली आहे.
यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत, विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख व डॉ.संतुक हंबर्डे, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, बाळू खोमणे, प्रवक्ते संतोष पांडागळे, विजय गंभीरे, संतोष मुळे, विनायक सागर, रामराव केंद्रे, कैलास सावते, सखाराम तुप्पेकर, कविता मुळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महानगर सरचिटणीस शीतल खांडील यांनी केले.



