*दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात जलसाक्षरतेच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात जलसाक्षरतेच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान*
*दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात जलसाक्षरतेच्या कार्याचा राष्ट्रीय सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आयोजित भव्य समारंभात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील तसेच जलसाक्षरता समिती अक्राणी आणि नमामि सातपुडा मिशन यांच्या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन कार्याचा गौरव करण्यात आला. भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते “जल प्रहरी 2025 (National Award)” प्रदान करून हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमात भरत पावरा, सुनील परमार, ॲड. संगिता एच. पाटील व निरुपम पाटील यांनी डॉ. एच. एम. पाटील व जलसाक्षरता समितीच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारला. देशभरातून एकूण 36 संस्था व व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ चार मान्यवरांचा समावेश आहे. त्यात डॉ. पाटील यांचा समावेश होणे ही नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण सातपुडा परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. कोरोना काळात, अत्यंत कठीण परिस्थितीतही सातपुडा पर्वतरांगांतील दुर्गम भागात लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून 21 ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमामुळे 225 पेक्षा अधिक एकर शेतीला दुबार पीक घेण्यास मदत झाली. तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली, गुरांसाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता निर्माण झाली. पाणी भरण्यासाठी होणारी मुली व महिलांची दैनंदिन पायपीट थांबली, त्यामुळे त्यांच्या वेळेची व श्रमाची मोठ्या प्रमाणावर बचत झाली. या व्यापक आणि परिणामकारक जलसंवर्धन मोहिमेतूनच “जलसाक्षरता समिती अक्राणी” या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. कोणताही मोबदला न घेता, केवळ समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम लोकसहभागाचा आदर्श नमुना ठरला आहे. लहान मुले, तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक—सर्वांनीच या कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि समाजजागृती या त्रिसूत्रीवर आधारित या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने सातपुडा परिसरातील ग्रामस्थ, स्वयंसेवक व जलसाक्षरता समितीचे सर्व कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. “जल प्रहरी 2025” हा पुरस्कार भविष्यातील जलसंवर्धन चळवळींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ॲड संगिता पाटील यांनी पुरस्कार स्वीकारतांना उपस्थित मान्यवरां समोर व्यक्त केला.



