*प्रधानमंत्री पिक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यात अंमलबजावणी-सी.के. ठाकरे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री पिक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यात अंमलबजावणी-सी.के. ठाकरे*
*प्रधानमंत्री पिक विमा योजना, रब्बी हंगाम 2025-26 साठी जिल्ह्यात अंमलबजावणी-सी.के. ठाकरे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 करिता सुधारित स्वरूपात राबविण्यात येत असून ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी कार्यान्वित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. योजनेचे स्वरूप आणि लाभ,
योजनेअंतर्गत, पिक पेरणी ते काढणी पर्यंत नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई निश्चित केली जाते. हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग / तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळात पिकाच्या उंबरठा उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई देय राहील. या योजनेत जोखीमस्तर 70 टक्के राहील. पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक 5 वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. सदर पिक विमा योजना पूर्णपणे “पिक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारित राहील”.
पात्र पिके आणि अंतिम मुदती, रब्बी हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्याकरिता रब्बी ज्वारी, गहू बागायत, हरभरा व उन्हाळी भुईमुग ही पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत. या पिकांसाठी सहभागी होण्याच्या अंतिम मुदती आणि विमा संरक्षित रक्कम खालीलप्रमाणे आहेत: रब्बी ज्वारी: शेतकरी हिस्सा रुपये 90 प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये 36 हजार राहील. सहभागी होण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. हरभरा: शेतकरी हिस्सा रुपये 90 प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये 36 हजार राहील. सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर, 2025 आहे. गहू बागायत: शेतकरी हिस्सा रुपये 225 प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये 45 हजार राहील. सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 डिसेंबर, 2025 आहे. उन्हाळी भुईमुग: शेतकरी हिस्सा रुपये 101.50 प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये 60 हजार 600 राहील. सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. सहभागासाठी अटी, ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. अधिसूचित क्षेत्रातील सर्व अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना (Agristack Farmer ID) व ई-पिक पाहणी नोंद करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी होण्यासाठी बँकमार्फत व सी. एस.सी. (CSC) मार्फत आपले विमा अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी या रब्बी हंगामात योजनेत सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाकरे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



