*निवडणूक प्रक्रिया ही प्रशासनासह लोकशाहीची प्रतिष्ठा;निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडाव्यात-डॉ. मित्ताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवडणूक प्रक्रिया ही प्रशासनासह लोकशाहीची प्रतिष्ठा;निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडाव्यात-डॉ. मित्ताली सेठी*
*निवडणूक प्रक्रिया ही प्रशासनासह लोकशाहीची प्रतिष्ठा;निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडाव्यात-डॉ. मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-“निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर लोकशाहीची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे कोणतेही कर्तव्य नजरेसमोरून सुटता कामा नये. तसेच प्रत्येक विभागाने जबाबदारीने व वेळेत कार्यवाही करून निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार पाडाव्यात.” असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत. संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग प्रमुखांची सर्वसमावेशक बैठक संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. सेठी बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक आशित कांबळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा गांगुर्डे, मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास पवार, राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधिक्षक स्नेहा सराफ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे (नंदुरबार), मयुर वसावे (शहादा) जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) जमीर लेंगरेकर यांच्यासह विविध यंत्रणांचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सेठी म्हणाल्या. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका निर्भय, शांततामय आणि पारदर्शकतेने होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक घटकाबाबत जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी अत्यंत स्पष्ट, आणि काटेकोर निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मतदान केंद्रांच्या पूर्वतपासणी, दुसरी तपासणी, अनधिकृत मतदान रोखण्यासाठीच्या उपाययोजना, पोलीस बंदोबस्ताचे नियोजन, त्रिस्तरीय इलेक्ट्रॉनिक मशीन तपासणी मतदार स्लिप चाचणी (Voter Slip Test - VST), पहिल्या स्तरावरील तपासणी/पहिली सिम्युलेशन चाचणी (First Level Checking/First Simulation Test-FST) आणि दुसरी सिम्युलेशन चाचणी (Second Simulation Test-SST) ही त्रिस्तरीय तपासणी वेळेत आणि अचूकरीत्या पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. वेबकास्टिंगसाठी केंद्रांची निवड अशा सुरक्षाविषयक आणि तांत्रिक मुद्द्यांवर जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी विशेष भर दिला. “प्रत्येक मतदान केंद्र सुरक्षित, सक्षम आणि विश्वासार्ह असले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. निवासी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष त्वरीत कार्यान्वित करण्याचे, सर्व औपचारिक आश्वासनांची पूर्तता करण्याचे, स्थिर पथकांची प्रभावी हालचाल सुनिश्चित करण्याचे आणि मतदान साहित्याची उपलब्धता व योग्य साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवश्यक साहित्य खरेदी, त्याचे वितरण, साठवण आणि वाहतूक व्यवस्थेची सिद्धता तपासण्याचे आदेश देण्यात आले. मतदान दिवशी अखंड आणि निर्दोष वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत महावितरण अधिकाऱ्यांना डॉ. सेठी यांनी संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष विद्युत पर्यायी सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला मतदान केंद्रांची दुरुस्ती, सुरक्षित प्रवेशमार्ग, दिव्यांग अनुकूल सुविधा आणि पाणीपुरवठा तपासणीचे स्पष्ट आदेश देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन, केंद्रांची पाहणी, नियंत्रण कक्ष स्थापन, प्राधान्य यादी, कर्मचारी निवास व्यवस्था, मतदान साहित्य वितरण, नाव नोंदणी/रद्दीकरण तपासणी, मतदान दिनाचा कृती आराखडा यावर जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी प्रत्येक टप्प्यात शिस्त, वेग आणि अचूकता राखण्याचे निर्देश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मतदानकाळात सर्व मद्यविक्री केंद्र व बार संपूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. संवेदनशील परिसरांमध्ये मद्यविक्रीवर कठोर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्याची सूचना देण्यात आली. परिवहन विभाग व परिवहन महामंडळाला मतदान पथके, अधिकारी आणि साहित्य वाहतुकीसाठी आवश्यक वाहने वेळेत उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा माहिती कार्यालयाला निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांनुसार अचूक, पारदर्शक आणि जबाबदारीने माहिती प्रसारित करण्याचे, अफवा व दिशाभूल रोखण्याचे, निवडणुकांबाबत जनजागृती वाढवण्याचे आणि सर्व माध्यमांशी समन्वय राखण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विभाग निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसाठी पूर्ण सज्ज असल्याचा विश्वास या बैठकीतून उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे यांनी व्यक्त केला.



