*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
*खा. अशोक चव्हाण यांची जिल्हा प्रशासनासमवेत बैठक, 'शक्तिपीठ', वनजमिनीचे पट्टे व पोलीस भरती उमेदवारांबाबत चर्चा*
नांदेड(प्रतिनिधी):-माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांसमवेत बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्ग, वन जमिनीचे पट्टे हस्तांतरित करणे आणि पोलीस भरतीतील उमेदवारांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह नांदेड महानगरचे भाजप अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, किशोर स्वामी आदी मंडळी उपस्थित होती. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामध्ये सुपिक शेती व फळबागा संपादित होणार असल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा. अशोक चव्हाण यांच्याकडे संरेखन बदलण्यासह विविध पर्यायांवर विचार करण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीत या विषयावर विचारविनिमय करण्यात आला. शेतकऱ्यांनी सुचवलेल्या पर्यायांवर प्रशासनाने विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
वर्षानुवर्षे वन जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या किंवा शेती करणाऱ्या नागरिकांना संबंधित जमिनीचे पट्टे हस्तांतरित करण्याची मागणी राज्य सरकारकडे विचाराधीन आहे. यामध्ये भोकर तालुक्यातील बंजारा व आदिवासी समाजातील अनेक नागरिकांचाही समावेश आहे. हा विषय पुढील तीन महिन्यात मार्गी लावण्याच्या अनुषंगाने महसूल व वनविभागाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याची सूचना माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला केली.
राज्यातील भाजप महायुती सरकारने पोलीस विभागात नुकतीच पंधरा हजाराहून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या तयारीसाठी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना सरावाकरिता पुरेशी मैदाने उपलब्ध नसल्याची तक्रार खा. चव्हाण यांच्याकडे आली होती. त्या अनुषंगाने पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशीही सूचना त्यांनी या बैठकीत केली.