*बहीणीसोबत प्रेम विवाह केल्याचे रागातून तरुणास जिवेठार मारणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप व 11 हजारांचा दंड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बहीणीसोबत प्रेम विवाह केल्याचे रागातून तरुणास जिवेठार मारणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप व 11 हजारांचा दंड*
*बहीणीसोबत प्रेम विवाह केल्याचे रागातून तरुणास जिवेठार मारणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली जन्मठेप व 11 हजारांचा दंड*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फिर्यादी नामे राज सलिम खाटीक, वय-24, रा.घरकुल, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोर, ता.जि. नंदुरबार याचा भाऊ अरबाज याने जयेश दयाराम गंगावणे याची बहीण नामे दिपाली दयाराम गंगावणे ऊर्फ झोया हिचेशी 2 वर्षापुर्वी प्रेमविवाह केला होता. सदर प्रेमविवाहातून दिपाली ऊर्फ झोया व अरबाज यांना 4 महिन्यांचा मुलगा आहे. अरबाज याने दिपाली सोबत प्रेमविवाह केल्याने जयेश गंगावणे हा अरबाज यास नेहमी जिवेठार मारण्याच्या धमक्या देत होता.
दि.3 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी राज खाटीक याचा भाऊ अरबाज व आई रुकसानाबी असे जळका बाजार येथे किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते मच्छीबाजार चौकात असलेल्या बोहरी मशिदला लागून असलेल्या दर्गाच्या रस्त्याने येत असतांना समोरुन जयेश दयाराम गंगावणे हा मच्छी बाजाराकडून फिर्यादीचे आई व भाऊ अरबाज यांच्या दिशेने चाकू घेऊन आला व अरबाजच्या खांदयाला पकडुन त्याने छातीत चाकू खुपसला होता. सदर चाकू हल्ल्यात अरबाज यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून फिर्यादी यांच्या आई रुकसानाबी यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीक घटनास्थळाकडे पळत आले व जखमी अरबाज यास जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे घेऊन गेले होते. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी अरबाज यास तपासून मयत घोषित केले. त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे आरोपीविरुध्द गु.र.नं. 73/2023, भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी केला असून आरोपी जयेश दयाराम गंगावणे, वय-19, रा.सा.बां. विभाग कार्यालयाचे शासकीय निवासस्थान, मच्छी बाजार, नंदुरबार यास तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्रन्यायाधीश -1, नंदुरबार यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी जयेश दयाराम गंगावणे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, नंदुरबार यांनी भा.द. वि.क. 302 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1) (3)/135 अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व व 11,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पैरवी अंमलदार पो.हे. कॉ./170 नितीन साबळे, पो.हे.कॉ./985 पंकज बिरारे, पो.हे.कॉ./945 शैलेंद्र जाधव, पो.हे. कॉ.411 राजेंद्र गावीत यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.