*जाणीवेचा एक कवडसा, देतो ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला दिलासा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जाणीवेचा एक कवडसा, देतो ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला दिलासा*
*जाणीवेचा एक कवडसा, देतो ऊसतोड मजुरांच्या संघर्षाला दिलासा*
नंदुरबार(प्रतिनीधी):-गरिबी, स्थलांतर आणि उपजीविकेच्या संघर्षात अडकलेल्या ऊसतोड मजुरांचे आयुष्य सहजासहजी कोणाला दिसत नाही. मात्र, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांच्या आयुष्यातील या संघर्षाची व्यथा केवळ समजून घेतली नाही, तर त्या व्यथांना सामोरे जाण्यासाठी एक संवेदनशील आणि प्रेरणादायी पाऊल उचलले. त्यांच्या या भेटीने ऊसतोड मजुरांच्या आयुष्याला आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याला दिलासा मिळाला आहे. संवेदनशील प्रशासकाची वेगळी ओळख डॉ. मित्ताली सेठी यांनी आज समशेरपूर साखर कारखाना परिसरातील साखर शाळेला आणि ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांना भेट दिली. केवळ प्रशासनिक अधिकार म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून त्यांनी मजुरांच्या आयुष्याच्या प्रत्येक कंगोऱ्याला स्पर्श केला. त्यांच्या सहृदयतेने या कष्टकरी लोकांच्या आयुष्यात एक नवीन प्रेरणेचा किरण निर्माण केला आहे. ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून उभारण्यात आलेल्या साखर शाळेत डॉ. मिताली सेठी यांनी भेट दिली. मुलांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेली निरागसता, डोळ्यांतील चमक आणि त्यांच्याशी साधलेली आपुलकीची नाळ हे दृश्य अतिशय भावूक करणारे होते.
मुलांशी संवाद साधून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल चौकशी करत, त्यांनी त्यांना पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. “तुम्ही शिकाल, मोठे व्हाल, तुमचं आयुष्य बदलाल आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी बनवाल,” असे सांगून त्यांनी मुलांच्या मनात नव्या स्वप्नांची बीजं रुजवली. डॉ. मित्ताली सेठी यांची ही भेट केवळ प्रतिकात्मक नव्हती, तर त्यांनी ऊसतोड मजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या राहणीमानातील अडचणी, कामाच्या कष्टदायक स्वरूपाचे वास्तव, आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयींसाठी त्यांनी सखोल चर्चा केली.
“तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी जे काही शक्य आहे, ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगताना त्यांच्या शब्दांत असलेल्या आपुलकीने कष्टकरी लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाची शलाका उमटवली. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पद्माकर टापरे यांनी ऊसतोड मजुरांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी बी.एफ. राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या उपक्रमांचा आढावा घेतला आणि मजुरांच्या आयुष्याच्या सुधारासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा केली. डॉ. सेठी यांची संवेदनशीलता फक्त प्रश्न जाणून घेण्यापुरती नव्हती; त्यांच्या प्रत्येक कृतीत सकारात्मक बदलाची तयारी दिसत होती. “ही मुले आपल्या हक्काचे शिक्षण घेऊन मोठी व्हावित, यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करेन,” असे त्यांचे आश्वासन उसतोड मजूर कुटुंबांच्या मनात आशेची नवी पालवी फुलवत होते. डॉ. मित्ताली सेठी यांची ही भेट एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या पारंपरिक चौकटीबाहेरची होती. त्यांच्या सुसंवादात दिसणारी माणुसकी, प्रत्येक समस्येला गांभीर्याने घेण्याचा दृष्टीकोन, आणि समाधानकारक सुचवलेल्या उपाययोजनांमुळे त्या केवळ एक जिल्हाधिकारी नाहीत, तर प्रशासनातील एक चौकटीपलिकडच्या संवेदनशील माणूसकीचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. या भेटीमुळे ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांमध्ये आनंदाची छटा पसरली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या सहृदयतेने आणि संवेदनशीलतेने ऊसतोड मजुरांच्या आयुष्याला एक नवा आशेचा किरण दाखवला आहे. प्रशासन फक्त नियम राबवणारे यंत्रणा नाही, तर समाजासाठी सकारात्मक बदल घडवणारे एक संवेदनशील माध्यम आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या कृतीने हे सत्य आणि संदेश अधोरेखित केला आहे.