*शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न*
*शहादा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न*
शहादा(प्रतिनिधि):-18 जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील भौतिकशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (आय.क्यु. ए. सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने “रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन” या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा सहायक आयुक्त, जि. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबारचे विजय रिसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांनी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन करून खानदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेचा आरंभ झाला. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात उद्घाटक व नंदुरबार जिल्हा कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे आपल्या वक्तव्यात म्हणाले की, युवा मित्रांनो समाजात व एकूणच आपल्या आसपास घटित होणाऱ्या घटनांकडे अत्यंत डोळसपणे बघण्याची व ऐकण्याची सवय करा. हे करत असतांना समाज मनाची स्पंदने आपल्या डायरीत नोंदवून त्यांचा अभ्यास करा. यातून तुमचे भावविश्व विस्तारत जाऊन तुमच्याठाई उद्योजकतेच्या नवनव्या संकल्पना आकाराला येतील व त्या साकार करण्याचे बळ आपणास निर्माण होईल. आजच्या या अत्यंत गतिमान आणि धकाधकीच्या जीवनात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी, आपल्या पायांवर ठामपणे उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करून उद्योजक व्हावे. यासाठी शिक्षण घेत असतांनाच आपले ध्येय निश्चित करत त्या दिशेने जोमाने वाटचाल करा. यासाठी त्यांनी ध्येय या शब्दाचा अर्थ उलगडत सांगितले की, आकर्षण स्वतःला गुंतवून घेणे सहभाग प्रयत्न मेहनत अभ्यास या आधारे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचे विश्व निर्माण करत, स्वतःमधील कौशल्ये विकसित करून, घराची उब सोडून बाहेर पडा, देवावर व स्वतःवर विश्वास ठेवत यश मिळेपर्यंत चालत रहा. असे सांगत त्यांनी नव उद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्याचे नमूद केले विद्यार्थ्यांना सुयश चिंतीले. या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, स्वयंरोजगाराने माणसाची स्वतंत्र ओळख निर्माण होते. या माध्यमाने तुम्ही स्वतःचे अस्तित्व व ओळख निर्माण करा असे संबोधित केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव व नंदुरबार जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त सौ. वर्षा जाधव यांनी नव उद्योजक बनण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देत म्हणाल्यात की, आजचा भारत हा सळसळत्या उत्साहाने भरलेल्या अत्यंत चौकस चिकित्सक व जागरूक युवकांचा देश आहे. उद्योजक जगताकडे बघत गगन भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा. हताश न होता संयम, शिस्त, चिकाटी, जिद्द, कौशल्य, प्रयत्न यांची एकत्रित सांगड घालत यशाला गवसणी घालण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
नंदुरबार जिल्हा कौशल्य विभागाचे समन्वयक मनोहर अहिरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना बोललेत की, शासकीय, खाजगी व स्वयंरोजगार असे रोजगाराचे अनेक प्रकार आहेत. यातून कोणता रोजगार निवडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक क्षेत्रात अनेक संस्था स्वयंरोजगारासाठीचे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील चैतन्य जागवण्याचे आवाहन केले.
सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु जाधव यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून दिले. सोबतच विद्यार्थ्यांना रोजगार आणि उद्योजकते मधला फरक समजावून देत सांगितले की, कुठल्याही गोष्टीची नोंद ठेवणे शिका. यासाठी तुम्ही वाचनाची कास धरली पाहिजे. अनेक देशातील कर्तुत्वान महापुरुषांची चरित्रे आपण वाचले पाहिजेत त्याच्यातून प्रेरणादायी घटना नोंद करून ठेवाव्यात व त्यांच्या पथावर आपण चालले पाहिजे. देश व विदेशातील उद्योगपतींची जीवन चरित्रे वाचण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना दृढनिश्चय बनण्याच्या मंत्र दिला. याप्रसंगी शहादा परिसरात स्वादिष्ट घरगुती पुरणपोळीसाठी प्रसिद्ध असलेले नाव श्रीमती मनीषा चौधरी यांनी मुलाखतीच्या माध्यमाने आपले भावविश्व उलगडत स्वयंरोजगाराचे उत्तम उदाहरण पेश केले. पत्तीच्या अकाली निधनानंतर हलाखीच्या परिस्थितीतही न डगमगता तीन मुलांचा सांभाळ करत दोन किलोच्या पुरणपोळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय हा 400 च्या वर पुरणपोळ्यांवर कधी पोहोचला हा अभ्यासाचा विषय आहे. परिस्थितीशी दोन हात करत सतत प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मुलाखतीतून केले.
याच मालिकेतील दुसऱ्या सत्रात सूरज फूड इंडस्ट्रीज शहादाचे ओनर पारसमल जैन यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडत सांगितले की, कुठल्याही शाखेचे शिक्षण हे माणसाच्या विकासाला पूरकच असते. ऍग्रोबेस इंडस्ट्रीचा अभ्यास लघु उद्योगासाठी खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच त्यांनी चार 'P' व चार 'M' च्या माध्यमाने लघु उद्योगाचे भाव विश्वही उलगडले. प्रॉडक्ट, प्राईस, प्रमोशन व प्लेसमेंट यासह मनी, मटेरियल, मार्केट व मॅनपावर इत्यादी बाबी लघुउद्योगासाठीही आवश्यक असल्याचे सांगत कष्टाशिवाय पर्याय नसल्याचे आवर्जून नमूद केले.
प्रसिद्ध उद्योजिका व सूरज फूड इंडस्ट्रीच्या ओनर अॅड. सौ. स्मिता जैन आपले अनुभव कथन करतांना म्हणाल्यात की, आज तुमच्याकडे ज्ञानाची अनेक साधने उपलब्ध आहेत. आपल्यातील छुपे गुण ओळखून त्यांना विकसित करा. कमीत कमी भांडवलातही खूप मोठी मजल मारता येऊ शकते व बुद्धी कौशल्याने तांत्रिक उद्योगांची निर्मिती करता येते. यासाठी व्यावसायिक वृत्ती जोपासा, आपल्या स्वभावाला व विचाराला चालना देऊन ताठ मानेने जगण्यासाठी लघु उद्योगाच्या माध्यमाने स्वावलंबी होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तृतीय सत्रात अनिल निंबा सुर्यवंशी यांनी "उद्योजकता/स्टार्ट अप ग्रामीण विकास" याबद्दल ग्रामीण भागात उद्योग उभा करण्यासाठी लागणारी पुर्तता, उत्पादन, विक्री व नंतर बायोप्रोडकट् अशी सखोल माहिती दिली. चौथ्या सत्रात एमडी, सनलाइट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, शहादा येथील जितेंद्र पाटील हे "नवीन स्टार्ट-अप ब्रान्ड डेव्हलपमेंट सोलर एनर्जी आणि लिथियम बॅटरी" या विषयावर मार्गदर्शन करत मोठ्या लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी, ऑफ ग्रिड सोलर इन्व्हर्टर, लिथियम एलएफपी बॅटरी इ. चे उत्पादनाबद्दल सखोल माहिती सांगितली. कंपनीचा Areng हा विश्वासार्ह ब्रान्ड असुन सर्व एनर्जी बॅकअप सोल्यूशन्ससाठी त्याची गरज आहे. कृषी, संरक्षण, पेट्रोकेमिकल आणि रिफायनरीजसह अनेक उद्योगांची पूर्तता करतो असे स्पस्टीकरण दिले. पाचव्या सत्रात एमडी, शितल अॅकॅडमी, शहादाचे योगेश अरुण शेंडे यांनी व्यवसायात उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी" याविषयावर मार्गदर्शन करत स्वनिर्मित उद्योग निर्माण करून रोजगार उपलब्ध करून देणे यावर सखोल माहिती देत, विद्यार्थ्यांनी स्वद्योगाकडे वळावे असा सल्ला दिला.
कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड म्हणाले की पाचही सत्रातील विषय तज्ञानी अत्यंत माहितीपूर्ण, मौल्यवान व ज्ञानवर्धक चर्चा करून विद्यार्थाना प्रेरणा दिली. आय. क्यु.ए.सी. व कार्यशाळेचे संयोजक डॉ. बी. वाय. बागुल यांनी प्रस्तावना करत कार्यशाळेचा विषय, त्याची निवड व उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन सहसंयोजक प्रा. एन. एम. साळुंके यांनी केले तर आभार प्रकटन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या तांत्रिक बाबींचे संचालन डॉ.एस. एस. ईशी, हितेश उमराव यांनी केले तर सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर बंधू यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.