*श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंतीच्या पार्श्वभुमीवर गणित दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंतीच्या पार्श्वभुमीवर गणित दिन साजरा*
*श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंतीच्या पार्श्वभुमीवर गणित दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर गणित दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस दरवर्षी 22 डिसेंबर रोजी गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या पार्श्वभुमीवर येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भामरे ॲकेडमीचे संचालक युवराज भामरे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह होत्या. व्यासपिठावर पर्यवेक्षिका सिमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येवून रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील गणित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणितावर आधारीत विविध उपकरणे, यंत्रे तयार केली होती. या उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी करुन विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. या उपकरणांचे परिक्षण श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विमलेश बागुल व प्रा.कमलेश अहिरे यांनी केले. यावेळी युवराज भामरे यांनी सांगितले, गणित हा विषय सोपा आहे, परंतू विद्यार्थ्यांकडून त्यांचा बाऊ केला जावून तो विषय कठीण वाटू लागतो. परंतू अशा गणितीय प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना गणिताबाबतची भिती दूर होण्यास मदत होणार असून शाळेतूनही अनेक रामानुजन तयार होवू शकतात, असे सांगितले.
मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह यांनी सांगितले, थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांनी गणिताबाबतचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांनी गणितीय विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये भरीव योगदान दिले. तसेच त्यांच्या काळात न सुटलेल्या गणितांच्या समस्यांवर देखील त्यांनी उत्तरे शोधली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गणितामध्ये आवड निर्माण करुन अशाचप्रकारे शोधकवृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.
शाळेतील संगीत शिक्षिका सौ. अनघा जोशी व त्यांच्या चमूने' नाच रे गणिता आमच्या मनात' हे गणित गीत सादर केले. फलक लेखन चित्रकला शिक्षक महेंद्र सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी वृंदा गवळी आणि हिमांशी बडगुजर यांनी केले. प्रास्ताविक नेहा पाटील व प्रसाद चौधरी यांनी केले. सर्व गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपकरणे बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. आभार उपशिक्षक सुनिल गिरासे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व गणित शिक्षकांनी परिश्रम घेतले.