*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे, 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे, 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे, 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भर दुपारी आरोग्य केंद्राला कुलूप लावलेले आढळल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भीम आर्मी कोकण विभागाचे कार्यकर्ते प्रितेश पवार यांनी जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता त्यांना केंद्र बंद असल्याचे दिसून आले. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर एक कर्मचारी बाहेर आल्या. यावेळी विचारपूस केली असता, कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितल्याचे पवार यांनी नमूद केले.
मात्र कर्मचारी संख्या कमी असणे हे आरोग्य केंद्र बंद ठेवण्याचे कारण होऊ शकते का, असा सवाल प्रितेश पवार यांनी उपस्थित केला आहे. जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून लांजा तालुका साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. एखाद्या रुग्णाला अचानक त्रास झाल्यास, अपघात घडल्यास किंवा तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास रुग्णांनी नेमके कुठे जावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांची व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉक्टर लांजा येथे वास्तव्यास असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, निवासी डॉक्टरांची व्यवस्था करावी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी, अशा मागण्या प्रितेश पवार यांनी केल्या आहेत.
"ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा. आरोग्य सेवा ही कोणाची मेहरबानी नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. शहरातील नागरिकांप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेलाही वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत," अशी भूमिका प्रितेश पवार यांनी मांडली. आता जिल्हा आरोग्य प्रशासन आणि जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन जावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



