*भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा उत्साहात समारोप, 353 गाव-पाड्यांमध्ये विविध उपक्रम, 1 हजार 139 लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा उत्साहात समारोप, 353 गाव-पाड्यांमध्ये विविध उपक्रम, 1 हजार 139 लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ*
*भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा उत्साहात समारोप, 353 गाव-पाड्यांमध्ये विविध उपक्रम, 1 हजार 139 लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 11 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026’चा उत्साहात समारोप झाला. या सप्ताहांतर्गत नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन तालुक्यांतील 353 आदिवासी गाव-पाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून एकूण 1 हजार 139 पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ,आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या नियोजनातून आठ दिवसीय सेवा सप्ताहात महिला सक्षमीकरण, ऐतिहासिक वारसा संवर्धन, स्वच्छता मोहीम, शासकीय सेवा वितरण, आरोग्य तपासणी आणि पोषण जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
महिला बचत गटांना अर्थसहाय्य, 12 व 13 नोव्हेंबर रोजी जिल्हा व तालुकास्तरीय पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सप्ताहाची माहिती देण्यात आली. केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजनेंतर्गत राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेतून नवापूर येथील 7 आणि शहादा तालुक्यातील चांदसैली येथील 9 अशा एकूण 16 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार रुपये अर्थसहाय्य मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन करण्यात आले.
353 गाव-पाड्यांमध्ये स्वच्छता मोहीम,
14 नोव्हेंबर रोजी आदि कर्मयोगी स्वयंसेवकांच्या सहभागातून नंदुरबार प्रकल्प कार्यालय परिसरासह तीनही तालुक्यांतील 353 गाव-पाड्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आदिवासी महापुरुषांची स्मारके, पुतळे, समाजमंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
मुख्य जयंती सोहळ्यात 220 लाभार्थ्यांना लाभ,
15 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन, नंदुरबार येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीचा मुख्य सोहळा पार पडला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हीना गावित आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘डिजिटल इन्फॉर्मेशन वनसंपदा पोर्टल’चे अनावरण करण्यात आले. तसेच 220 लाभार्थ्यांना शेती साहित्य, वैदू प्रमाणपत्रे, वनपट्टे आणि बचत गट अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित शिबिरात 113 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शासकीय सेवा व आरोग्य शिबिरांना प्रतिसाद, 16 व 17 नोव्हेंबर रोजी धानोरा, दुधाळे, राणीपूर, लक्कडकोट आणि धनराट येथे विशेष शासकीय सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमधून 463 नागरिकांना सातबारा उतारे (120), शिधापत्रिका (51), संजय गांधी निराधार प्रमाणपत्रे (41), महिला शेतकरी प्रमाणपत्रे (35), अधिवास व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे, आयुष्मान कार्ड तसेच बी-बियाणे आदी लाभांचे वितरण करण्यात आले. 17 नोव्हेंबर रोजी वाघाळे, विसरवाडीसह विविध ठिकाणी आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा 296 नागरिकांनी लाभ घेतला. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ थेट पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी, आदि कर्मयोगी स्वयंसेवक, विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी आणि आदिवासी बांधवांनी दिलेल्या सहकार्याबद्दल प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी सर्वांचे आभार मानले आहे.



